कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील नागरी क्षेत्रातील वृक्षगणना होणार असून, पन्नास वर्षांपूर्वीच्या जुनाट वृक्षांची यापुढे 'हेरिटेज' वृक्ष म्हणून गणना होणार आहे. कोल्हापूर शहरातही अशा वृक्षांचा लवकरच सर्व्हे केला जाणार आहे. याबाबत शासनाचे आदेश महापालिकेस प्राप्त झाले आहेत. मात्र, शासन आदेशात स्वयंस्पष्ट निर्देश नसल्याने नेमकी प्रक्रिया कशी व कधी राबवावी या सूचनांच्या प्रतीक्षेत महापालिका यंत्रणा आहे.
यासाठी महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरण नेमण्यात येणार असून, सचिव दर्जाच्या अधिकार्यांचा त्यात समावेश राहणार आहे. या प्राधिकरणामार्फत राज्यातील पुरातन वृक्षांचे जतन व संवर्धन करण्याचे काम होणार आहे. पुरातन वृक्ष तोडण्यासाठी या प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक केली आहे. तसेच, स्थानिक पातळीवर स्थानिक वृक्ष प्राधिकरण नेमण्यात येणार आहे. नगरपालिकांचे मुख्याधिकारी प्राधिकरणाचे अध्यक्ष राहणार आहेत. दर पाच वर्षांनी वृक्ष गणना होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणावर राहणार आहे.'हेरिटेज' वृक्षांचे वर्गीकरण करणे, त्यांची गणना व संवर्धन करण्याचे काम हे प्राधिकरण करणार आहे.
ऑक्टोबरनंतर येणार मोहिमेस गती
शासनाने याबाबत आदेश दिला असला तरी नेमकी प्रक्रिया कशी व कधी राबविणार? वृक्षांचे आयुष्यमान कसे आणि कोण ठरविणार याबाबत अद्याप सुस्पष्ट आदेश आले नाहीत. ऑक्टोबरअखेर याबाबतचे सविस्तर आदेश येण्याची शक्यता असून, त्यानंतर मोठ्या गतीने या मोहिमेस सुरुवात होणार आहे.