कोल्हापूर

कोल्हापूर शहरवासीयांची पाण्यासाठी धावाधाव; आजपासून सुरळीत पाणीपुरवठा

अमृता चौगुले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिंगणापूर बंधारा दुरुस्तीमुळे कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा मंगळवारी विस्कळीत झाला. शहराच्या बहुतांश भागात पाणी न आल्याने टँकरचे पाणी घेण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू होती. शिंगणापूर बंधारा दुरुस्तीचे काम मंगळवारी दुपारी दोन वाजता पूर्ण झाले. बंधारा दुरुस्ती पूर्ण होताच धरणातून तत्काळ पाणी सोडण्यात आले. त्यामुळे बुधवारी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

शिंगणापूर बंधार्‍याच्या लोखंडी प्लेट खराब झाल्याने गेली दहा वर्षे या बंधार्‍यास मोठ्या प्रमाणात गळती होती. गळतीमुळे नदीत पाणी असूनही पाणी उपसा करताना अडचणी येत होत्या. तर मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाण्याचा प्रकार सुरू होता. एप्रिलमध्ये महापालिकेने बंधारा दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र, त्यावेळी पूर्ण दुरुस्ती होऊ शकली नाही. त्यामुळे पुन्हा रविवारपासून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. रविवारी दुपारपर्यंत पाणी पातळी कायम असल्याने पाणी उपसा करून रविवार आणि सोमवार दोन दिवस शहरात कमी-अधिक प्रमाणात पाणीपुरवठा सुरू होता.

शिंगणापूर बंधारा दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यात आली. मंगळवारी दुपारपर्यंत सर्वच्या सर्व म्हणजे 13 लोखंडी प्लेट बदलण्यात आल्या.
याबरोबरच बंधार्‍यातील गाळही काढण्यात आला. गेल्या दहा वर्षांपासून या बंधार्‍यास गळती होती.

ही गळती काढल्याने आता भविष्यात बंधारा दुरुस्तीचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. मंगळवारी दुपारी बंधार्‍याचे काम पुर्ण होताच पाटबंधारे विभागचे कार्यकारी अभियंता रोहीत बांदिवडेकर यांनी बंधार्‍यास भेट देउन पाहणी केली. यावेळी जलअभियंता अजय साळोखे व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. बांदीवडेकर यांनी तत्काळ धरणावरील कर्मचार्‍यंना सूचना देउन पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे दुपारी दोन वाजता धरणातून पाणी सोडण्यात आले. धरणातील पाणी बंधार्‍यापर्यंत येण्यासाठी सहा ते सात तासाचा अवधी लागतो. रात्री बंधार्‍याजवळ पाणी पातळी पूर्ण झाल्यास महापालिकेतर्फे पाणी उपसा करुन टाक्या भरण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवारी दुपारनंतर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे पाणी पुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले.

सोमवारी संपूर्ण नदी कोरडी झाल्याने मंगळवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहिला. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एकाचवेळी बंद राहिल्याने प्रशासनासह नागरिकांचीही चांगलीच तारांबळ उडाली. पाण्यासाठी नागरिकांना दिवसभर धावाधाव करावी लागली. महापालिकेने टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला. टँकरचे पाणी घेण्यासाठी टँकरभोवती गर्दी झाली होती. तर टँकरवर पाणी घेताना नागरिकांत किरकोळ वादवादी झाली. 'ई' वॉर्डमध्ये महापालिकेचे 4 आणि खासगी 6 अशा दहा टँकरमार्फत पाणीपुरवठा करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. नागरिक बोअर असणार्‍या ठिकणांसह मिळेल तेथून पाणी घेत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT