कोल्हापूर शहर हद्दवाढीच्या मुद्द्यावर मागे हटणार नाही. हद्दवाढीसाठी सकारात्मक असलो तरी हद्दवाढीतील प्रस्तावित ग्रामस्थांच्या शंकाचे निरसन झाले पाहिजे. लादून नव्हे तर चर्चा आणि समन्वयातून हद्दवाढ करूया. हद्दवाढ व्हावी ही माझी प्रामाणिक इच्छा आहे, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी हद्दवाढ समन्वय समितीला दिली. शहर हद्दवाढ सर्वपक्षीय समन्वय समिती पदाधिकार्यांनी अजिंक्यतारा कार्यालयात पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊन हद्दवाढीसाठी पुढाकार घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली.
पालकमंत्री पाटील म्हणाले, शहराच्या हद्दवाढीत प्रस्तावित गावांचा कृती समितीने दिवाळीनंतर दौरा करून ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून शंका निरसनाचा प्रयत्न करावा. यानंतर महिन्यात ग्रामस्थांसोबत संयुक्त बैठक घेऊ. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमवेत ग्रामस्थांच्या प्रश्नांचे निराकरण कसे करता येईल याचा आढावा घेऊ. श्रेय घेण्यासाठी नव्हे तर एका नियोजनबद्ध प्रक्रियेतून हद्दवाढ करूया. निधीसाठी नव्हे तर शहरासह आजूबाजूच्या गावांच्या नियोजनबद्ध विकासासाठी हद्दवाढ कशी महत्त्वाची आहे, ते पटवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया.
आ. चंद्रकांत जाधव यांनी गावातील जागांवर आरक्षण पडणार हा गैरसमज दूर करू. टप्प्याटप्प्याने हद्दवाढ केल्यास विरोध होणार नाही, असे सांगितले. समन्वय समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी 42 पैकी किमान 20 गावांचा हद्दवाढीत समावेश व्हावा, असे सांगितले. अॅड. बाबा इंदूलकर यांनी तीन गावे हद्दवाढीसाठी सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी पाणीपट्टी, घरफाळा यातील फरक तसेच गावांचा विकास आदी मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, राहुल माने, अर्जुन माने, बाबा पार्टे, कुलदीप गायकवाड, किशोर घाडगे, अशोक भंडारे, जयकुमार शिंदे, दुर्गेश लिंग्रस, कमलाकर जगदाळे, सुभाष देसाई, अश्पाक आजरेकर, स्वप्निल पार्टे आदी उपस्थित होते.
हद्दवाढप्रश्नी शहर आणि ग्रामस्थ या दोन्ही घटकांशी पालकमंत्री सतेज पाटील हे संबंधित आहेत. हद्दवाढीच्या मुद्द्यावर आता फायनल मॅच सुरू आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी षटकार मारून हद्दवाढीचा प्रश्न निकाली काढावा, असे सतीशचंद्र कांबळे यांनी आवाहन केले. यावर पालकमंत्री पाटील यांनी चर्चा आणि समन्वयातून नक्की मार्ग काढूया. एकतर्फी निर्णय घेता येणार नाही. बॉल रोलिंग करण्यासाठी या गावकर्यांचे म्हणणे ऐकून त्यांचे निरसन करणे गरजेचे आहे, असे स्पष्ट केले.