कोल्हापूर

कोल्हापूर : वैद्यकीय विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे : डॉ. साळुंखे

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भारतामध्ये आरोग्य क्षेत्रात आणखी वेगाने संशोधनाची गरज आहे. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे, असे आवाहन नवी दिल्ली येथील 'इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी'चे माजी संचालक डॉ. दिनकर साळुंखे यांनी केले. कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या 11 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

या दीक्षांत सोहळ्यात जम्मू-काश्मीरच्या सहायक पोलिस आयुक्त शाहिदा प्रवीण गांगुली, दै. लोकमतचे संपादक वसंत भोसले यांना डी.लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी 9 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले तर डॉ. नवनाथ पडळकर यांना 'एक्सलन्स इन रिसर्च' म्हणून सन्मानित करण्यात आले. दीक्षांत सोहळ्यात 520 विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवीने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास कुलपती डॉ. संजय डी. पाटील, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य आ. ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, मुबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, वित्त अधिकारी श्रीधर नारायण स्वामी आदी उपस्थित होते.

भारत जगाची फार्मसी म्हणून ओळखली जात असून औषध निर्मितीच्या बाबतीत आपण तिसर्‍या क्रमांकावर आहे, असे सांगून डॉ. साळुंखे म्हणाले, 140 कोटी लोकसंख्येला पुरेसे ठरतील एवढे डॉक्टर आजही उपलब्ध नाहीत. ज्यांना आज पदवी मिळाली आहे ते सर्वजण भारताची गुंतवणूक आहेत, असेही डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

प्रभावी लसीकरण

भारत लस निर्मितीबाबत अग्रेसर असून डिसेंबर 2022 पर्यंत, भारतात कोव्हिड-19 लसीकरणाचे 2.2 अब्ज डोस देण्यात आले. भारतातील शास्त्रज्ञांनी बनवलेल्या कोव्हिड लसींनी 150 हून अधिक देशांना मदत झाली. भारतात 4.5 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रभावी लसीकरणामुळे 45 लाख मृत्यू टाळता आले. विक्रमी वेळेत शंभर कोटी लोकांना कोव्हिड-19 विरुद्ध लसीकरण करून भारताने मोठा विक्रम केला आहे. हे सर्व संशोधनामुळेच शक्य झाल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

कुलगरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडला. आरोग्यसेवेत पदार्पण करणार्‍या विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान, अनुभव याचा उपयोग देश उभारणीसाठी करावा, असे आवाहन केले.

यावेळी सौ. शांतादेवी डी. पाटील, तेजस पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, मेघराज काकडे, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेशकुमार शर्मा, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सुचित्राराणी राठोड, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, सीएचआरओ श्रीलेखा साटम तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीक्षांत सोहळ्यानंतर विद्यार्थिनींनी एकच जल्लोष केला.

सुवर्णपदक मानकरी

अंकुर जैन, योगिता पाटील, उपासना कदम, रश्मी एन. एस., अश्विन लोकापूर, विजयपाल कटला, सेजल राणे, दिया मोरे, ऋत्विक राय या 9 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. डॉ. नवनाथ शंकर पडळकर यांचा एक्सलन्स इन रिसर्च अ‍ॅवॉर्डने सन्मान करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT