कोल्हापूर; डॅनियल काळे : गरिबांवरही मोफत उपचार करण्यासाठी राज्याप्रमाणेच केंद्र सरकारनेही आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे. यासाठी गोल्डन कार्ड काढावे लागते. 2011 च्या सामाजिक, आर्थिक पाहणी अहवालातून गरीब लोकांच्या नावाची यादी शासनानेच तयार केली आहे. या यादीतील लोकांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड मिळणार आहे. हे कार्ड असणार्या कुटुंबातील लोकांना दरवर्षी पाच लाखांचे उपचार करता येणार आहे. देशात कोठेही उपचार करण्याची सुविधा आहे. एवढी चांगली योजना असूनही अपेक्षित प्रमाणात गोल्डन कार्ड काढायला प्रतिसाद मिळेना झाला आहे. कार्ड काढण्यात अनेक तांत्रिक अडथळे आहेत. हे अडथळेच दूर करण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत माहिती देणारी वृत्तमालिका
आजपासून…
आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड योजनेच्या यादीत नाव आहे; परंतु संंबंधित नागरिकांचे आधार कार्डच अपटेड नाही. मोबाईलशी आधार कार्ड लिंकही नाही. ग्रामीण भागात कित्येक नागरिकांकडे मोबाईलही नाही. त्यामुळे अशा नागरिकांचे गोल्डन कार्ड काढण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. सरकारी यंत्रणेने संपर्क साधूनही काही ठिकाणी लोकांकडून प्रतिसादच मिळत नाही. योजना चांगली असूनही लोकांपर्यंत ती नीट पोहोचली नाही. केंद्र असो अथवा राज्य सरकार गोरगरिबांना डोळ्यांसमोर ठेवून विविध योजना आखत असते. परंतु, त्या योजनांची माहिती लोकांना होत नाही. ग्रामीण भागात अशिक्षितपणामुळे लोक योजनापासून वंचित राहतात. शहरी भागातील नागरिक ताणतणाव व दैनंदिन धावपळीमुळे अशा योजनांची माहितीच घेत नाहीत. आजारी पडल्यानंतर अथवा गंभीर आजारानंतर त्यांना अशा योजनांची आठवण होते. मग, ते कार्ड कसे काढायचे, आपल्याला ते मिळणार का, अशी धावपळ ऐनवेळी करावी लागते. त्यामुळे वेळीच सावध झाले, तर खर्चात पडायची गरज नाही.
आयुष्यमान भारत योजनेंतर्गत दोन कार्ड दिली जातात. एक आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड आणि दुसरे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड यापैकी गोल्डन कार्ड असेल, तर त्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर पाच लाख रुपयांचा उपचार देशात कोठेही करता येतो. आयुष्यमान भारत हेल्थ कार्डमध्ये आपल्या आरोग्याची आणि तपासणी अहवालाची सर्व माहिती अपडेट होते. ही दोन वेगवेगळी कार्ड आहेत. त्यामुळे यासंदर्भात गफलत नको. गोल्डन कार्ड असेल तरच मोफच उपचार होणार आहेत.