कोल्हापूर

कोल्हापूर : विशाळगडावरील पाणवठे लुप्त..!

दिनेश चोरगे

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा :  शिवकालीन किल्ले विशाळगड सुमारे 333 हेक्टर क्षेत्रात टेकड्या व माळरानाने व्यापलेला आहे. पावसाळ्यातील चार महिने येथे वादळी अतिवृष्टी होते. झाडाविना गड भकास आहे. शिवाय पावसाचे पडणारे पाणी जमिनीत मुरविणारे जलसंधारणाचे कोणतेच काम येथे नाही. परिणामी येथील शिवकालीन पाणवठ्यांची क्षमता घटत आहे, तर काही झरे लुप्त झाले आहेत. गडावर रणमंडळ टेकडी, सतीचा माळ, तास टेकडी, गड सदरेचा माळ, अहिल्याबाई वृंदावन परिसर, वेताळ टेकडी, बावन्न सती माळ, पाताळ, पाचल टेक ही ठिकाणे जलसंधारणास पूरक आहेत.

गडावर वृक्षारोपण झालेले नाही. शासकीय विभाग व सेवाभावी संस्थांनी येथे जलसंधारणाची मोहीम हाती घेतली तर गडाला सावलीचे, हिरवाईचे रूप येईल. तसेच जलस्रोतांची पाणी पातळी वाढण्यास मोलाची मदत होईल. रणमंडळ टेकडी खालील नगार भाविकांना खुली राहते. पावसाळ्यात ती काठोकाठ भरते, मात्र उन्हाळ्यात मार्चलाच तळ गाठते. दगडी बांधीव बावातील गाळ काढण्याची गरज आहे. या बावीच्या मागील बाजूला मोठा जलाशय आहे. त्याचे बांधकाम करून पावसाळ्यात पाणीसाठा केला तर या विहिरीची पाणी पातळी सुधारू शकते. शिवाय रणमंडळ टेकडीवर जलसंधारणाचे काम करावे लागेल.

गजापूर येथील गेळवडे प्रकल्पाच्या बॅक वॉटर वरून नळपाणी योजना गडासाठी राबविली आहे. हे पाणी नागरिकांना व पर्यटकांना मर्यादित मिळत असल्याने भाविकांना विकत पाणी घ्यावे लागते. ग्रामपंचायतीने काही वर्षांपूर्वी एक टाकी उभारून दोन रुपयांत घागरभर पाणी सवलतीच्या दरात दिले. त्या टाकीवर भाविकांची रांग लागत होती. मात्र, ही योजना बारगळली आहे. सद्या भाविकांना विकतच पाणी घ्यावे लागते. पाच वर्षांपूर्वी तत्कालीन मंत्री सदाभाऊ खोत यांनी गडावरील पाणी योजनेसाठी साडे चार कोटी देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, याबाबत कोणतेही काम गडावर झालेले दिसत नाही.

शिवरायांकडून जलस्रोत उभारणी

स्वराज्याच्या काळात 1671 ते 72 या काळात शिवरायांनी विशाळगडाच्या डागडुजीवर पाच हजार रुपये खर्च केल्याची नोंद आहे. त्यातून तटबंदी, बुरुज, मंदिर व जलस्रोत उभारलेत. स्वातंत्र्यानंतर मात्र येथील मूलभूत सुविधाकडे दुर्लक्ष झाले आहे. येथे निधी उपलब्ध करून ऐतिहासिक बाज सांभाळणार्‍या वास्तू, समाधी व शिवकालीन जलस्रोत उभारण्यास प्राधान्य देणारे धोरण राबवायला हवे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT