कोल्हापूर

कोल्हापूर : विमानतळ विकासकामांना आणखी किती मुदतवाढ?

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर विमानतळावर नव्याने उभारण्यात येत असलेली टर्मिनस इमारत, एटीसी टॉवर, विस्तारित धावपट्टीसाठी आवश्यक भूसंपादन या कामांची गती कधी वाढणार, विमानतळावर विकास कामांसाठी आणखी किती मुदतवाढ द्यायची, असे सवाल उपस्थित होत आहेत.

कोल्हापूर विमानतळावर टर्मिनस इमारत उभारण्यात येत आहे. या इमारतीसाठी मार्चअखेरची मुदत देण्यात आली होती. या मुदतीतही इमारतीचे काम पूर्ण होण्याची शक्यता नाही. सध्याच्या कामाची गती आणि उपलब्ध साधनसामग्रीचा विचार करता या इमारतीचे काम पूर्ण होण्यास आणखी तीन ते चार महिन्यांहून अधिक कालावधी लागेल, अशीच शक्यता आहे. अशीच अवस्था एटीसी टॉवरची आहे.

नव्याने उभारल्या जात असलेल्या या इमारतीच्या दर्शनी भागाला कोल्हापुरी ऐतिहासिक परंपरेचे दर्शन होईल, असे रूप दिले जाणार आहे. तशी घोषणा तत्कालीन केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी केली होती. विद्यमान मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही दर्शनी भाग असाच राहील, असेही स्पष्ट करत यासाठी विशिष्ट प्रकारचा दगड वापरण्याबाबतही सूचना केली आहे. मात्र, या दर्शनी भागाबाबत अद्याप मंजुरी देण्यात आली की नाही, हेच स्पष्ट होत नाही. यामुळे हे कामही रखडण्याची शक्यता आहे. या इमारतीत राज्य शासनाच्या सहकार्याने वस्तुसंग्रहालयही उभारण्यात येणार आहे; मात्र त्याबाबतही कोणतीही हालचाल नाही.

धावपट्टीचा 2300 मीटर पर्यंत विस्तार केला जाणार आहे. सध्या 1910 मीटरपर्यंतचे काम झाले आहे. उर्वरित कामासाठी आवश्यक भूसंपादन अद्याप पूर्ण झालेले नाही. भूसंपादन अपूर्ण असल्याने विस्तारीकरणाची निविदा काढलेली नाही. यामुळे विस्तारीकरणाचे काम पूर्णत्वाकडे जाण्यासाठी आणखी दीड-दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो अशीच स्थिती आहे. विमानतळावर 110 चारचाकींसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.

विस्तारीकरणासाठी आवश्यक 64 एकर जागेपैकी सुमारे 25 एकर जागा थेट खरेदी प्रक्रियेने प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. उर्वरित जागेसाठीच्या प्रक्रियेचा वेग वाढवण्याची गरज आहे. ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांच्या मोबदल्यालाही आता टीडीएस लावला जात आहे. यामुळे स्वत:च्या जमिनी देऊन, त्यातून मिळणार्‍या मोबदल्यातूनही कपात होत असल्याने शेतकर्‍यांतही नाराजी आहे.

नागरी हवाई वाहतूकमंत्री लक्ष देतील का?

टर्मिनस इमारतीचे फेब्रुवारी 2019 मध्ये भूमिपूजन झाले होते. दोन वर्षांत हे काम पूर्ण होणार होते. आता तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. अद्याप काम अपूर्ण आहे. गेल्या चार महिन्यांत नागरी हवाई वाहतूकमंत्री तीनवेळा कोल्हापूर दौर्‍यावर आले. सोमवार, दि. 27 पासून पुन्हा दोन दिवसांच्या कोल्हापूर दौर्‍यावर ते येत आहेत. या कालावधीत विमानतळाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी वेळ काढावा, पाहणी करावी, बैठक घ्यावी, सूचना द्याव्यात अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त केल्या जात आहेत.

SCROLL FOR NEXT