कोल्हापूर

कोल्हापूर : ‘लक्ष्मीपुरी’चा कॉन्स्टेबल लाचप्रकरणी गजाआड

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : नागाळा पार्क येथील बांधकाम व्यावसायिकाकडून गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याच्या बहाण्याने दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल दिग्विजय पांडुरंग मर्दाने (रा. शिंगणापूर, ता. करवीर) याला लाचलुचपत प्रतिबंध पथकाने सोमवारी अटक केली. त्याच्याविरुद्ध लक्ष्मीपुरी ठाण्यातच गुन्हा दाखल झाला आहे.

नागाळा पार्क येथील बांधकाम व्यावसायिक अनिल साखळकर यांच्याविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात 2021 मध्ये भारतीय दंड विधान संहिता 420 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास मर्दानेकडे सोपविण्यात आला आहे.

उर्वरित रकमेसाठी तगादा

गुन्ह्याच्या तपासात मदतीच्या बहाण्याने मर्दानेने बिल्डरकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. त्याने यापूर्वी 25 हजार रुपये उकळले आहेत. उर्वरित रकमेसाठी कॉन्स्टेबलचा तगादा सुरू होता. दहा हजार रुपये देण्यावर त्यांच्यात समेट झाला होता.

लाच मागणीची महिन्यापूर्वी पडताळणी

साखळकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधकचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्याकडे तक्रार दाखल केली. दि. 27 डिसेंबर 2021 रोजी पथकामार्फत त्याची पडताळणी झाली. यामध्ये लाचेची मागणी करण्यात आल्याचे निष्पन्‍न झाले होते. शिवाय यापूर्वी 25 हजार रुपये स्वीकारल्याचे स्पष्ट झाले होते. तपास पथकामार्फत सोमवारी सकाळी मर्दानेविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्याला अटक करण्यात आली असून, मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

SCROLL FOR NEXT