कोल्हापूर

कोल्हापूर :रेल्वे विकासाला ‘ग्रीन सिग्‍नल’ कधी?

सोनाली जाधव

कोल्हापूर : अनिल देशमुख
रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म विस्तारीकरण, पादचारी उड्डाण पूल, परिख पूल दुरुस्ती अशी कामे काही वर्षांपासून रखडली आहेत. कोल्हापूर-मिरज दुहेरीकरण, नव्या गाड्या, बंद असलेल्या गाड्या सुरू करणे, कोल्हापूर-वैभववाडी, हातकणंगले-इचलकरंजी मार्ग आदींसह सेवा-सुविधांकडेही दुर्लक्षच केले जात असल्याचे चित्र आहे. यामुळे कोल्हापूर रेल्वे विकासाला 'ग्रीन सिग्‍नल' कधी मिळणार, असा सवाल कोल्हापूरकर करत आहेत.

कोल्हापूर हे मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांपैकी एक मानले जाते. यामुळेच मॉडेल स्थानक म्हणून कोल्हापूरचा विकास करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. धार्मिक आणि पर्यटनद‍ृष्ट्या कोल्हापूरचे देशभरात महत्त्व आहे. यामुळे दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या रेल्वे सेवेचा कोल्हापुरात विकास होणे अपेक्षित आहे. मात्र, कोल्हापूरला रेल्वेकडून सापत्नपणाचीच वागणूक दिली जाते की काय, अशी स्थिती आहे.कोल्हापूर रेल्वे विकासाबाबतचे सर्व प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्याबाबत रेल्वेकडून सकारात्मक द‍ृष्टिकोन दाखवला जात नाही. यामुळेच स्थानकाचा विकास रखडला आहे. कोल्हापूरच्या रेल्वेबाबतच्या मागण्या सातत्याने मांडल्या जात आहेत. या मागण्या रास्त आहेत, योग्य आहेत. मात्र, त्याकडे सकारात्मक द‍ृष्टीने पाहण्याची आणि त्या तडीस नेण्याची गरज आहे.

ही कामे रखडलेली

प्लॅटफार्म विस्तारीकरण– तीन प्लॅटफार्मची चार फ्लॅटफार्म होणार. पूर्ण लांबीचे होणार. ऑगस्ट 2018 पासून काम रखडलेले आहे. 8 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर आहे.
पादचारी उड्डाण पूल– मध्यवर्ती बसस्थानक व राजारामपुरी दिशेने
ये-जा करणार्‍यांसाठी पादचारी उड्डाण पूल. पाच वर्षांपासून काम रखडलेले आहे. निधी रेल्वेकडे वर्ग केला आहे.
परिख पूल दुरुस्ती- कोल्हापूर शहरातील दळणवळणाचा प्रमुख मार्ग अशी ओळख. दुरुस्तीची मागणी करूनही रेल्वेचे 'कायद्या'चे उत्तर. निधीची स्थानिक प्रशासनाची तयारी.

या मागण्या प्रलंबितच

कोल्हापूर-मिरज दुहेरीकरण, कोल्हापूर-वैभववाडी, हातकणंगले-इचलकरंजी मार्ग, कोल्हापुरातून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करा. गुडस् मार्केट यार्डमध्ये आवश्यक सुविधा द्या.
कोल्हापूर-मिरज मार्गावर शटल सेवा, पॅसेंजर रेल्वेची संख्या वाढवा. कोल्हापूर-पुणे इंटरसिटी, कोल्हापूर-मुंबई सुपरफास्ट सेवा, कोल्हापूर-अहमदाबाद आठवड्यातून तीन वेळा. कोल्हापूर रेल्वे स्थानक इमारतीचा विकास. लांब पल्ल्याच्या, नव्या मार्गावर गाड्या सुरू करा. पुणे येथील काही गाड्यांचे कोल्हापूरपर्यंत विस्तारीकरण करा.

महाव्यवस्थापक आज पाहणी करणार

कोल्हापूर रेल्वे स्थानकाची मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी मंगळवारी सकाळी पाहणी करणार आहेत. त्यांच्या दौर्‍याची रेल्वेने जय्यत तयारी केली आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत स्थानकाची स्वच्छता, दुरुस्तीची कामे सुरू होती. लाहोटी सकाळी सात वाजता स्थानकावर येतील, पाहणी करून ते दहा वाजता मिरजेकडे रवाना होणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT