कोल्हापूर

कोल्हापूर : रेल्वे फाटक होणार बंद

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी या मार्गावर ये-जा करणार्‍या हजारो पादचार्‍यांची काही दिवस गैरसोय होणार आहे. या मार्गावरील रेल्वे फाटक येत्या काही दिवसांत बंद होणार आहे. या ठिकाणी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामाला गती आली असून 31 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

रेल्वे स्थानकावरील सध्याच्या तीन प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. यासह आणखी एक नवा प्लॅटफॉर्म उभारला जात आहे. 24 ते 28 डब्यांच्या गाड्या उभ्या करता येतील, इतक्या लांबीचे हे प्लॅटफॉर्म होणार आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक एक हा सुमारे अर्धा किलोमीटर लांबीचा असून त्याचे काम येत्या 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण केले जाणार आहे.

या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे रेल्वे फाटकातून होणारी नागरिकांची ये-जा पूर्णपणे बंद होणार आहे. यामुळे रेल्वेकडून हे फाटक बंद करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत त्याची कार्यवाही होणार आहे. या परिसरात सध्या वेगाने काम सुरू असून प्लॅटफॉर्म बांधणीसाठी आवश्यक भर टाकण्यात आली आहे. त्यानुसार बांधकाम आणि रूळ टाकण्याचेही काम सुरू आहे. या फाटकासमोरच प्लॅटफॉर्म असल्याने त्यावर चढून पुन्हा रुळावर खाली उतरून पुन्हा दुसर्‍या प्लॅटफॉर्मवर चढून पुन्हा खाली उतरून नागरिकांना ये-जा करणे शक्य नाही. रेल्वे प्रशासनही तशी परवानगी देण्याची शक्यता नाही

एफओबीसाठी निधी; पण अद्याप मंजुरी नाही!

या मार्गावर एफओबी (पादचारी उड्डाणपूल) बांधण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार रेल्वेकडे आवश्यक रक्कमही भरली आहे. मात्र या पुलाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. याच ठिकाणी भुयारी मार्गालाही मंजुरी मिळाली आहे. मात्र तो प्रत्यक्षात अस्तित्वात यायला काही वर्षांचा कालावधी जाऊ शकतो. यामुळे फाटक बंद झाल्यानंतर नागरिकांना परिख पुलाखालूनच ये-जा करावी लागेल अथवा प्लॅटफॉर्मचे काम बंद करावे लागेल. यापैकी दोन पर्यायच समोर आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT