इचलकरंजी, संदीप बिडकर : इचलकरंजी – अतिग्रे मार्गावरील रुकडी रेल्वे गेट येथील उड्डाणपुलाचे काम अद्याप अपूर्ण आहे. सुमारे अडीच वर्षांपासून हे काम सुरू आहे. काम करणार्या दोन कंपन्या यापूर्वीच सोडून गेल्या. त्यानंतर मिचगेन या कंपनीने हे काम पूर्ण करण्याची हमी घेतली. कंपनीला वारंवार मुदतवाढ देऊनही अद्याप हे काम अपूर्ण असल्याने रेल्वे न्यायालय व रेल्वे बोर्डाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. यामध्ये ठेकेदार कंपनीची 10 कोटींची सुरक्षा रक्कम जप्तीचा कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबई येथील मिचगेन कन्स्ट्रक्शन कंपनीला या उड्डाण पुलाच्या कामाचा ठेका देण्यात आला होता. महारेल 25 कोटी रुपये खर्चून हा उड्डाणपूल बनवत आहे. जून 2022 पर्यंत काम पूर्ण करून उड्डाणपूल रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र,अडीच वर्षे काम संथगतीने सुरू होेते.
ठेकेदाराला जूननंतर पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. उड्डाणपूल 15 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश कोर्टाकडून दिले होते. सहा महिन्यांत काम पूर्ण न केल्यास 10 कोटींचा दंड आकारला जावा, असा निर्णय रेल्वे कोर्ट आणि रेल्वे बोर्डाकडून दिला होता. या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना पिलर उभे करून सुरक्षा कठड्याचे काम सुरू आहे.
उड्डाणपुलाचे अद्यापही बहुतांश काम अपूर्ण आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी साधारणतः महिन्याचा किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. मिचगेन ठेकेदार कंपनीने वेळेत काम पूर्ण केले नसल्याने त्यांच्यावर कोणती कारवाई होते, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.