कोल्हापूर

राजगडावरील मुक्कामास पुरातत्त्व विभागाची बंदी

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : रयतेच्या स्वतंत्र सार्वभौम स्वराज्याची पहिली राजधानी असणार्‍या आणि शिवछत्रपतींच्या आयुष्यातील 25 वर्षांचा साक्षीदार असणार्‍या राजगडावर मुक्काम करण्यास राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाने बंदी घातली आहे. याबाबतचा आदेश बुधवारी जाहीर होताच दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक व ट्रेकर्स संघटनांकडून याचा कडाडून विरोध करण्यात आला आहे. या तुघलकी निर्णयाला कडाडून विरोध झालाच पाहिजे, असे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात आले आहे.

राजगडावर मुक्काम राहिलेल्या लोकांकडून येथे अन्न शिजविले जाते. यामुळे विविध प्रकारचा कचरा निर्माण होतो. तसेच अनेक वास्तूंच्या आडोशाला शौचास बसत असल्याने दुर्गंधी निर्माण होत आहे. यामुळे राजगडावर मुक्कामास बंदीचा आदेश पुरातत्त्व विभागाने जाहीर केला आहे. या निर्णयाविरोधात गडप्रेमी, इतिहासप्रेमी, ट्रेकर्स एकवटले असून पुरातत्त्व विभागाच्या कारभाराविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

राजगडावर सरसकट मुक्कामास बंदी हा काही उपाय नव्हे. खरंतर राजगड व्यवस्थित अनुभवायचा झाला तर येथे एका मुक्कामाला पर्याय नाही. गडावर काही चुकीचे होत असेल तर चर्चा करून मार्ग निघू शकतो. राजगड देखभाली पुरातत्वच्या ताब्यात आहे. त्यावर त्यांची मालकी नाही.
– भगवान चिले (दुर्ग अभ्यासक)

राजगडावरच नव्हे तर महाराष्ट्रातील कोणत्याही किल्ल्यावर राहण्यासाठी बंदी असू नये. सर्व शिवप्रेमी हे शासकीय अधिकार्‍यांसारखे लॉजला राहू शकत नाहीत. किल्ला पूर्ण पाहाण्यासाठी किमान एक मुक्काम गरजेचा आहे.
– इंद्रजित सावंत
(इतिहास अभ्यासक)

शिवपूर्व काळात सत्ताधार्‍यांकडून लोकांना त्रास देण्यासाठी वेगवेगळे कर लावले जात होते. त्या पद्धतीचे निर्णय पुरातत्त्व विभाग घेत आहे. मुक्कामाला बंदीचा निर्णयही त्यापैकीच एक आहे. त्यांनी राजगडावरील जुने बांधकाम पाडणे बंद करून त्यांना संरक्षण द्यावे.
– अमित आडसुळे
(मोडी लिपी अभ्यासक)

SCROLL FOR NEXT