कोल्हापूर

कोल्हापूर : यंदा देखावे लवकर खुले

Arun Patil

कोल्हापूर ; सागर यादव : महापूर व लॉकडाऊननंतर तीन वर्षांनी होत असलेला यंदाचा गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांचा असल्याने त्याची लगबग गेल्या महिनाभरापासूनच सुरू आहे. विविध मंडळांच्या गणेश आगमन मिरवणुका गणेश चतुर्थीपूर्वीच झाल्या असून, पहिल्याच दिवशी बहुतांशी गणेशांची प्रतिष्ठापनाही करण्यात आली. वैशिष्ट्यपूर्ण व मानाच्या गणेशमूर्ती पहिल्याच दिवसापासून दर्शनासाठी खुल्या झाल्या असून, विविध प्रतिकृतीही पूर्ण झाल्या आहेत.

प्रतिवर्षी घरगुती गणेश विसर्जनानंतर सार्वजनिक गणेशोत्सवाला वेग येतो. मात्र, यंदा हा वेग गणेश चतुर्थीपूर्वीपासूनच सुरू आहे. यामुळे एरव्ही गणेश विसर्जनानंतर सुरू होणारे सार्वजनिक देखावे यंदा घरगुती गणेशोत्सवादरम्यानच खुले होत आहेत. घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन सोमवारी (दि. 5) होणार असून, तत्पूर्वी दोन दिवस म्हणजेच शनिवार व रविवारच्या सार्वजनिक सुट्ट्यांदिवशीच बहुतांशी देखावे खुले करण्यात येणार आहेत. यामुळे सार्वजनिक तालीम संस्था व तरुण मंडळांच्या गणेशोत्सव समित्यांची जय्यत तयारी सुरू आहे.

निर्बंधमुक्‍त गणेशोत्सवामुळे गणेश मंडळांच्या वतीने वेगळेपण जपणारा उत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे. गणेश आगमनाच्या मिरवणुकीपासून ते गणेश विसर्जन मिरवणुकीपर्यंतची जोरदार तयारी करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तालीम, मंडळांना भरघोस देणग्या देणारे इच्छुक उमेदवार उपलब्ध आहेत. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाल्याचे चित्र आहे. मिरवणुकांसाठी डॉल्बी सिस्टीम, लेसर शो, पारंपरिक लोककलांची पथके, भव्य सजीव व तांत्रिक देखाव्यांचे नियोजन अनेकांनी केले आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अन् राजर्षी शाहू स्मृती शताब्दी

यंदाच्या गणेशोत्सवात देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी वर्षाच्या थीमवर आधारित देखावे सादरीकरणाची तयारी अनेक मंडळांनी केली आहे. सार्वजनिक मंडळांप्रमाणेच घरगुती गणेशांसमोर मांडण्यात येणार्‍या आरासमध्येही विविध विषयांवर देखावे साकारण्यात आले आहेत. शहरातील शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी परिसरातील गणेश मंडळांकडून सुरू असणारी देखाव्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. याशिवाय ऐतिहासिक, पौराणिक, समाज प्रबोधनपर आणि विनोदी सजीव देखाव्यांचीही तयारी सुरू आहे.

वैशिष्ट्यपूर्ण व मानाच्या मूर्ती, देखावेही खुले

गणेशोत्सवाचे आकर्षण असणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण व मानाच्या गणेशमूर्ती बर्‍याचदा उशिरा खुल्या होतात. मात्र, यंदा या मूर्ती पहिल्याच दिवशी खुल्या झाल्या आहेत. यात छत्रपती शिवाजी चौकातील 21 फुटी महागणपती, संयुक्‍त छत्रपती शिवाजी रिक्षा मंडळाची 21 फुटी गणेशमूर्ती, दिलबहार तालीम मंडळाचा दख्खनचा राजा, गोलसर्कल तरुण मंडळाच्या गणेशाचा दरबार, पुल गल्‍ली तालीम मंडळ, पाटाकडील तालीम, शनिवार पेठेतील एस.पी. बाईज, जुना बुधवार पेठ तालीम व भगतसिंग तरुण मंडळाची 21 फुटी गणेशमूर्ती, शनिवार पेठेतील अष्टविनायक तरुण मंडळ, मनपा परिसरातील सम—ाट चौक मंडळाचा 21 फुटी गणेश, शुक्रवार गेट येथील 21 फुटी गणेश, शाहूनगर मित्र मंडळाची फायबरची 21 फुटी मूर्ती, शाहू फे्ंरड सर्कलची 21 फुटी मूर्तीचा समावेश आहे. तसेच मंगळवार पेठेतील छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ पारंपरिक शाडूची मूर्ती, कलकल ग्रुप, महालक्ष्मीनगरातील प्राचीन शैलीतील गणेशमूर्तीही आकर्षक आहेत.

SCROLL FOR NEXT