कोल्हापूर

कोल्हापूर : यंदा घुमणार ढोल- ताशांचा ‘गजर’

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : पाणीदार डोळे, प्रसन्न मुद्रा आणि आशीर्वादासाठी उंचावलेला हात, अशा या गणरायाच्या मोहक रूपात भारावलेल्या भाविकांच्या गर्दीत निघणार्‍या मिरवणुकीत वाजणारे ढोल-ताशे हे गणेशोत्सवाच्या काळात गल्लोगल्ली दिसणारे चित्र. पारंपरिक वाद्यांचा गजर कानावर पडताच गणेश भक्तांचे पाय आपोआपच थिरकू लागतात. यंदादेखील ढोल-ताशांची जादू मिरवणुकीत पाहायला मिळणार आहे. कोरोनाच्या निर्बंधात संपूर्णतः शिथिलता मिळाली आहे. परिणामी, पारंपरिक वाद्यांना मोठी मागणी आहे. यामुळे पापाची तिकटी आणि आझाद चौक येथे वाद्यांच्या खरेदीसाठी आणि दुरुस्तीसाठी गर्दी होऊ लागली आहे.

उत्सव काळात डॉल्बीवर कर्णकर्कश गाणी लावून नाचण्याची प्रथा रुजत असतानाच पुन्हा एकदा ढोल पथकांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यातही पारंपारिक ढोल- लेझीम पथके आपले वेगळेपण आणि अस्तित्व टिकवून आहेत. याशिवाय लेझिम, झांज, तबला, ढोलकी, डफली, हार्मोनियम आदी वाद्यांच्या खरेदी व दुरुस्तीसाठी बाजारात गर्दी दिसून येत आहे. या वाद्यांच्या निर्मितीसाठी मिरज, मुंबई, सोलापूर, उत्तर प्रदेश , गुजरात येथून चामडे, शाई, वादी असे साहित्य खरेदी केले जाते.

शहरात तयार झालेल्या वाद्यांना कोकणातून मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ढोल पथकांमध्ये व्यवसायापेक्षा आपला वारसा जपण्याची धडपड अधिक असते. त्यामुळे ते प्रेम आणि आत्मियता त्यांच्या वादनातूनही झिरपते. विविध मंडळांकडून सुपार्‍या मिळाल्यानंतर गणेश चतुर्थीपूर्वी दोन-तीन दिवस ही पथक जिल्ह्यात दाखल होतात. पथकाच्या आकारानुसार त्यांना मानधन दिले जाते. प्रत्येक झांजपथकात किमान 40 ते 50 वादक असतात. त्यांची वयोमर्यादा 10 ते 12 वर्षांपासून ते 40 ते 50 पर्यंत असते. गणेशोत्सवात झांजपथकातील जो तो आपापल्या सोयीप्रमाणे आपापले मानधन ठरवतो.

दोन वर्षांनंतर पुन्हा गजर घुमणार…

गणेशोत्सव म्हटले की, ढोल-ताशांचा गजर आलाच. गतवर्षी कोरोनामुळे सार्वजनिक मिरवणुकांवर बंदी होती. उत्सवावरही मर्यादा आल्या होत्या. सध्या दैनंदिन जीवन सुरळीत सुरू असून, वादनालाही परवानगी आहे. त्यामुळे उत्सवप्रेमी यंदाचा गणेशोत्सव अधिक जल्लोषात साजरा करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र शहरभर दिसत आहे. मागील दोन वर्षांची कसर यंदा भरून काढण्याची तयारी या पथकांकडून सुरू आहे.

मंडप तपासणीसाठी पथके

महापालिका हद्दीतील सार्वजनिक सण, उत्सव, समारंभप्रसंगी उभारण्यात येणार्‍या मंडपांची तपासणी करण्यासाठी तपासणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. एकूण 20 पथके असल्याचे करवीरचे उपविभागीय दंडाधिकारी वैभव नावडकर यांनी सांगितले. नागरिकांनी सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ याप्रसंगी उभारण्यात येणार्‍या मंडपांच्या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास तपासणी पथक सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

निवासी नायब तहसीलदार बिपीन लोकरे, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, मंडल अधिकारी भरत जाधव, अनिल काटकर , तलाठी किरण पाटील, पुरुषोत्तम ठाकूर, पोलीस निरीक्षक जुना राजवाडा पोलिस ठाणे, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, नायब तहसीलदार विजय जाधव, उपशहर अभियंता नारायण भोसले, मंडल अधिकारी संतोष पाटील, विलास तोडकर, तलाठी अमित पाडळकर, निवास जाधव, नायब तहसीलदार विजय जाधव, शहर उपअभियंता बाबुराव दभडे, मंडल अधिकारी दीपक पिंगळे, तलाठी विपीन उगलमुगले, प्रल्हाद यादव, संतोष भिऊगंडे, नायब तहसीलदार सजंय वळवी, शहर उपअभियंता हर्षजित घाटगे, मंडल अधिकारी प्रणाम भगले, तलाठी राजू कोरे अशी पथकातील सदस्यांची नावे असून त्यांच्या क्रमांकावर अथवा ई-मेल आयडीवर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT