कोल्हापूर

कोल्हापूर : मोकाट जनावरे रस्त्यावर आढळल्यास मालकांवर कारवाई

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात लम्पीस्कीनची लागण झालेली जनावरे आढळून आली असल्यामुळे जनावरे मोकाट सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. मोकाट जनावर सोडल्याचे आढळल्यास संबंधित पशुपालकांवर गुन्हा नोंदविण्यात येईल. अशी माहिती पशुसवंर्धन पुणे आयुक्त सचिंद्र सिह यांनी सोमवारी दिली. लप्मीची लक्षणे आढळल्यास तत्काळ नजीकच्या पशुसंवर्धन दवाखान्याशी संपर्क साधावा. दिरंगाई केल्यास संबंंधित पशुपालकांवर गुन्हा नोंदविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

हातकणंगले तसेच पन्हाळा तालुक्यामध्ये लम्पीचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पण झाले आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता नियमांचे पालन करावे, असे आवाहन करून सचिंद्र सिंह म्हणाले, 'लम्पी'चा फैलाव बाहय किटकाव्दारे तसेच जनावराच्या त्वचेवरील व्रणामधुन, नाकातून वाहणारा स्त्राव, लाळ आदीमुळे होत असल्याने पशुपालकांनी मच्छर, गोचीड, गोमाश्या यांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. योग्यवेळी उपचार केल्यास जनावरे बरे होतात. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हात शिघ्र कृती दले स्थापन केली आहेत. गांवामध्ये लम्पी बाधीत जनावर आढल्यास तेथे इपीसेंटर स्थापन करण्यात येणार असून या केंद्रांच्या पाच किलो मिटरमध्ये येणा-या गावांमध्ये मोफत लसीकरण व बाधीत जनावरांवर उपचार करण्यात येणार आहेत. सहकारी दूध संस्थांकडील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने लसीकरण व उपचार सुरू आहेत. त्याचा पशुपालकांनी लाभ घ्यावा. असेही आवाहनही त्यांनी केले.

अफवा पसरवरणार्‍यांवर कारवाई

लम्पीस्कीन प्रामुख्याने केवळ गोवर्गीयास होत असल्याचे आढळुन आले आहे. तरीही याबाबत अफवा परसविण्यात येत आहेत. अशा आफवा पसरविणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लम्पीची लक्षणे आढळल्यास तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास तत्काळ कळवावे. दिरंगाई केल्यास खासगी पशुवैद्यक, पशु व्यापारी, वाहतुकदार यांच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात येईल. बाधीत जनावरांपासून निरोगी जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याने परराज्यातील व जिल्हातील गोजातीय तसेच म्हैस जातीय यांची वाहतूक करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. गोवर्गीय तसेच म्हैशीचा बाजार भरविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतू शेळया मेंढयांचे बाजार भरविण्यास कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करण्यात आलेला नाही. असे सचिंद्र सिंह यांनी सांगितले.

अतिग्रेतील गोठ्यास पशुसंवर्धन आयुक्तांची भेट

पशुसंवर्धन आयुक्त सचिंन्द्र प्रताप सिंह यांनी अतिग्रे गावातील लम्पी बाधीत जनावरांच्या गोठ्यास भेट देवून जनावरांची पाहणी करून शासकीय पशुवैद्य वेळेवर येतात की नाही याची चौकशी केली. लोकांनी लम्पी सदृश्य लक्षणे दिसल्यास शासकीय पशुवैद्य यांंना या बाबत सूचित करावे व मोफत औषध उपचार करून घ्यावेत. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ पठाण यांच्या कडून चालू असलेल्या उपाय योजनांची माहिती व औषध पुरवठ्याची माहिती घेतली यावेळी जिल्हाधिकारी डॉ राहुल रेखावार, प्रांताधिकारी डॉ विकास खरात ,तहसीलदार कल्पना ढवळे,सरपंच सागर पाटील, विनायक पाटील, महादेव चौगुले आदी उपस्थित होते.

शासनाकडून 15 हजारापासून 30 हजारापर्यंत मदत जाहीर

दरम्यान, लम्पीस्कीनमुळे जनावर मृत झाल्यास पशुपालकास शासनाने मदत जाहीर केली आहे. दुधाळ जनावरांसाठी 30 हजार (तीन जनावरांपर्यंत) बैलांसाठी 25 हजार (तीन जनावरांपर्यंत) व वासरांसाठी 16 हजार रुपये (सहा जनावरांपर्यंत) देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती स्थापन केली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी, पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पशसंवर्धन विभागाचे दोन सहाय्यक आयुक्त यांचा समावेश आहे. शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने सर्व जिल्हा परिषदांना यासंबंधीचे पत्र पाठविले आहे.

SCROLL FOR NEXT