कोल्हापूर

कोल्हापूर : माथाडी कामगारांच्या काम बंदमुळे कांदा मार्केटमधील उलाढाल ठप्प

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : गुमास्ता कामगारांची वेतनवाढ करा, यार्डात काम करणार्‍या महिला कामगारांना माथाडी कायदा लागू करा, यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर हमाल गुमास्ता पंचायतीच्या वतीने सोमवारी मार्केट यार्डात काम बंद आंदोलन केले. या आंदोलनात कांदा-बटाटा विभागातील सर्व माथाडी कामगार सहभागी झाले होते. यामुळे कांदा मार्केटमधील कामकाज ठप्प झाल्याने 1 कोटीची उलाढाल ठप्प झाली.

माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हमाल गुमास्ता पंचायतीच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाचा भाग म्हणून कामगारांनी शाहूपुरी येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला कामगार सहभागी झाल्या होत्या.

यानंतर संघटनेचे जनरल सेक्रेटरी विकास मगदूम, उपाध्यक्ष बाळासाहेब चौगुले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना निवेदन दिले. गुरव यांनी या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. पूर्वी काम केलेल्या हमालांना दुकानात काम द्यावे, गुमास्ता कुशल कामगारांच्या पगारात 25 टक्के वाढ करावी, किमान वेतनप्रमाणे पगार द्यावा, पुरुष माथाडी कामगारांना दरवर्षी 10 टक्के वाढ करावी आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.

या आंदोलनात मापाडी मंडळाचे राज्य संघटक कृष्णात चौगले, गुमास्ता पंचायतीचे उपाध्यक्ष संभाजी आबणे, तानाजी पाटील, गोपाळ मुडे, संजय चव्हाण, प्रकाश लव्हटे, श्रीमती लक्ष्मी चिपचे आदी सहभागी झाले होते. दरम्यान, माथाडी कामगार, मंडळातील अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक झाली. या मागण्यांबाबत दोन दिवसांत मुंबईमध्ये कामगार आयुक्तांशी चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब चौगुले यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT