कोल्हापूर

कोल्हापूर : मातोश्री की ठाणे? शवसैनिकांकडून होतेय नेत्यांकडे विचारणा

मोनिका क्षीरसागर

कोल्हापूर ; सचिन टिपकुर्ले:  कुठे आहे? मातोश्री की ठाणे, अशी विचारणा जिल्ह्यातील शिवसैनिकांना तसेच शिवसैनिकांकडूनही नेत्यांकडे केली जात आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार प्रकाश अबिटकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये खिंडार पडले आहे. राजकीय पदांची अभिलाषा बाळगत अजून कोणीही जाहीरपणे आपण कुठे आहे सांगायला तयार नाही; पण मातोश्री की ठाणे, यावरून शिवसैनिकांची भूमिका स्पष्ट होऊ लागली आहे.

हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन शिवसेना राजकारणात सक्रिय झाली; पण महाराष्ट्रात सत्तेची गणिते जुळवताना त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ घ्यावी लागली. यामुळेच अनेक कट्टर शिवसैनिक नाराज होते; पण तशी उघड भूमिका घेत नव्हते. पक्षाचा मुख्यमंत्री असूनही ग्रामपंचायत, नगरपालिकेतील शिवसेनेच्या सदस्यांना निधी मिळत नव्हता. शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांची भेटच दुर्मीळ झाली होती.

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार होते; पण एक मंत्रिपदही मिळाले नाही. त्याचाच परिणाम म्हणून सेनेचा एकच आमदार निवडून आला. तेही शिंदे गटात गेले आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निवडून येण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ घ्यावी लागली. तीच स्थिती प्रकाश अबिटकर यांची होती.

कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, करवीर, शिरोळ, हातकणंगले मतदार संघांतून गेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेचे आमदार निवडून आले असले, तरी त्यांना नंतर निवडणुकीत पराभूत करण्यात अन्य राजकीय पक्षांना सेना कार्यकर्त्यांचा मोलाचा हातभार होता अशीही चर्चा आहे. कोल्हापूर शहरात तर प्रथमपासूनच सेनेत गटबाजी आहे. काहीजण मातोश्री की ठाणे, अशी विचारणा करून अन्य शिवसैनिकांचा अंदाज घेत आहेत. यावरून कोल्हापुरातही शिवसेना विरुद्ध शिंदेसेना असे दोन गट पडल्याचे स्पष्ट आहे.

SCROLL FOR NEXT