कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : संक्रांतीसाठीची मातीची भांडी तयार करताना विजेचा धक्का लागल्याने प्रदीप जोतिराम कुंभार (वय 22, रा. कुंभार गल्ली, खुपीरे) याचा मृत्यू झाला. इलेक्ट्रिक चाकावर तो कुंभार काम करत असताना ही घटना घडली. वडिलांच्या मृत्यूनंतर प्रदीपवर घरची जबाबदारी होती. त्याच्या मृत्यूने कुंभार कुटुंबाचा आधारच हरपला आहे.
प्रदीपच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्याच्या दोन्ही बहिणी विवाहित असून, तो आईसोबत खुपीरेत राहत होता. मुक्त विद्यापीठाच्या पदवीचे दुसर्या वर्षाचे शिक्षण घेत तो एमआयडीसीमध्ये काम करून घर चालवत होता. घरचा पारंपरिक कुंभार व्यवसाय असल्याने तो आईला या कामी मदत करायचा.
बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास त्याने इलेक्ट्रिक व्हील सुरू केले. मातीची भांडी तयार करण्यासाठी त्याने चाकावर चिखल टाकून हात लावताच त्याला विजेचा जोराचा झटका बसला. तो ओरडल्यानेे शेजारील काही तरुण धावत आले. त्यांनी वीज प्रवाह बंद करून प्रदीपला बाजूला केले.
प्रदीपला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सीपीआर आवारात प्रदीपचे नातेवाईक व मित्र परिवाराने केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.