कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी मोठ्या मताधिक्याने विजयश्री खेचून आणत कोल्हापूरच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान मिळवला. जाधव यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्त्यांनी शहरात रॅली काढत महाजल्लोष केला. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीने शहरातील वातावरण उत्साही बनले होते.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रचार संपेपर्यंत चुरशीचे वातावरण होते. शनिवारी सकाळी राजाराम तलाव येथील शासकीय गोदामात सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. सुरुवातीपासून महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी मताधिक्याची आघाडी घेतली होती. जसजशी मतमोजणी होत गेली, तसे प्रत्येक फेरीत जयश्री जाधव यांचे मताधिक्य वाढत राहिले. यानंतर समर्थकांनी जल्लोषाला सुरुवात केली.
सकाळी नऊ वाजल्यापासून जयश्री जाधव यांचे निवासस्थान व मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी येथील स्व. आ. चंद्रकांत जाधव यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. सकाळी 11 च्या सुमारास जाधव यांनी विजयाची निर्णायक आघाडी घेतली. यानंतर शहरात ठिकठिकाणी जल्लोषाला सुरुवात झाली. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षांचे झेंडे, नेत्यांचे कटआऊट घेऊन दुचाकीसह ओपन टप जीपमधून शहरातून रॅली काढली. यावेळी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या विजयाच्या घोषणा देत गुलालाची उधळण केली. जाधव यांचे निवासस्थान व संपर्क कार्यालय परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी 'आण्णाच्या माघारी, ताई तुमची जबाबदारी'च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. 18 फेर्या पूर्ण झाल्यावर मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू झाला. शहर व उपनगरात विविध ठिकाणी जाधव यांच्या विजयांचे पोस्टर्सही झळकले.
दरम्यान, दीड वाजता पेठांमधील कार्यकर्त्यांनी आ. जाधव यांच्या संपर्क कार्यालय व छत्रपती शिवाजी चौकात जमून विजयोत्सव साजरा केला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी जाऊन निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, माजी आ. मालोजीराजे, मधुरिमाराजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर.के.पवार, माजी आ. सुजित मिणचेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव यांनी कार्यकर्त्यांसह शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला. समर्थकांनी घोषणाबाजी करत गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. सायंकाळी उशिरापर्यंत तरुण कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून शहरातून रॅली काढून आनंद व्यक्त केला. तसेच न्यू पॅलेस येथे मालोजीराजे समर्थकांनी जल्लोष केला.
माझ्या पोरानं चांगलं काम केलं. अनेकांचं कल्याण केलं. त्याचा मला मोठेपणा आहे. पोरानं जी माणसं उभी केली, तीच आज पाठीशी उभी राहिली, अशी भावनिक प्रतिक्रिया स्व. चंद्रकांत जाधव यांच्या आईंनी दिली. कोल्हापूरच्या विकासाचा वडिलांनी आराखडा तयार केला. स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर हे त्यांचे व्हिजन पूर्ण करणे ही आता आमची जबाबदारी आहे. त्यांची क्षणाक्षणाला आठवण येत असल्याचे सांगताना त्यांच्या मुलीला अश्रू अनावर झाले. निवडणूक जिंकून सुद्धा कोणताही अविर्भाव त्यांच्या कुटुंबीयांमध्ये नव्हता. माध्यमांसमोर भावना व्यक्त करताना स्व. आ. चंद्रकांत जाधव यांचे कुटुंब भावनिक बनले होते.
कोल्हापूर उत्तरच्या इर्ष्येच्या पोटनिवडणुकीत अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवाराने गड राखला. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांचे होमग्राऊंड असलेले कोल्हापूर पुन्हा भाजपमुक्त बनले. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी 'चलो हिमालय की गोद में' अशा आशयाची पोस्टर्स झळकवली. चंद्रकांत पाटील यांना हिमालयात जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मात्र, पोलिसांनी ही पोस्टर्स हटविण्यास कार्यकर्त्यांना भाग पाडले.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होईल तसे भाजप कार्यकर्ते दिसेना झाले. काँग्रेसच्या उमेदवार जाधव यांचे मताधिक्य वाढत गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजप कार्यालय व उमेदवाराचे निवासस्थान व संपर्क कार्यालयात निरव शांतता पाहायला मिळाली. याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारात महिलांची आघाडी होती. निवडणुकीत त्या विजयी झाल्यावर महिला मागे राहिल्या नाहीत. शहरात ठिकठिकाणी महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला. महाराणी ताराराणी यांच्या कोल्हापुरात नारीशक्तीचा विजय झाल्याचे दाखवून दिले.