कोल्हापूर

कोल्हापूर : महापालिकेत नोकरीचे बनावट नियुक्ती पत्र देणार्‍या भामट्याला बेड्या

Arun Patil

कोल्हापूर : महापालिकेत नोकरीच्या आमिषाने आयुक्तांच्या सहीचे बनावट नियुक्ती पत्र देऊन बेरोजगार तरुणाकडून 1 लाख 75 हजार रुपये उकळणार्‍या भामट्याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या. संतोष रंगराव पाटील (वय 35, रा. पांगिरे, ता. भुदरगड) असे त्याचे नाव आहे. 2021 ते 28 जुलै 2021 या काळात हा प्रकार घडला.

नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यताही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी व्यक्त केली.
महापालिकेतील कोट्यवधींच्या घरफाळा घोटाळ्यानंतर महापालिकेचे लेटरपॅड, त्यावर आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून तरुणांना गंडा घालणार्‍या संशयिताचा भांडाफोड झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या घटनेची दखल घेतली आहे. तपासाधिकार्‍यांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, महागाव (ता. गडहिंग्लज) येथील युगंधर मगदूम यांची संशयिताशी जानेवारी 2021 मध्ये ओळख झाली. कोल्हापूर महापालिकेत लिपिक, मुकादमपदांसाठी भरती होत आहे. मनपातील काही वरिष्ठ अधिकारी संपर्कात असल्याने त्याने तरुणाला लिपिकपदाच्या भरतीचे आमिष दाखविले.

नोकरीच्या बहाण्याने संशयिताने वेळोवेळी तसेच ऑनलाईनद्वारे 1 लाख 75 हजार 100 रुपये उकळून लिपिकपदाच्या नियुक्तीचे पत्र दिले. त्यासाठी महापालिकेचे लेटरपॅड, शिक्का, याशिवाय आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीचाही वापर करण्यात आला आहे, असे तपासाधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक अंजना फाळके यांनी सांगितले.

युगंधर मगदूम यांची फिर्याद दाखल होताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी पहाटे संशयिताला ताब्यात घेतले. आज, शनिवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. संशयिताविरुद्ध यापूर्वी मुंबईत वसई, विरार येथे फसवणूक व भुदरगड पोलिस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल आहे, असेही त्यांनी सांगितले. नोकरीच्या आमिषाने संशयिताने आर्थिक फसवणूक केलेली असल्यास संबंधितांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही आवाहनही फाळके यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT