कोल्हापूर

कोल्हापूर : महापालिकेचा आज सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर महापालिकेचा गुरुवारी (दि. 15) सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून विविध कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे.

महापालिकेत सकाळी 9.15 वाजता वीर माता, वीर पिता व वीर पत्नी यांचा सत्कार आणि सकाळी 9.45 वाजता आरोग्य विभागाकडील उत्कृष्ट काम करणार्‍या सफाई कर्मचार्‍यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सफाई कर्मचार्‍यांसाठी काम करताना रिफ्लेक्टिंग जॅकेट व सुरक्षा साहित्यांचे वाटप केले जाणार आहे. महिला व बालकल्याण समितीच्या वतीने सकाळी 10.15 वाजता इयत्ता 10 वी परीक्षा अव्वल गुणांनी उत्तीर्ण झालेल्या 66 विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात येणार आहे. अग्निशमन विभागात उल्लेखनीय काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा व पूरपरिस्थितीत, कोव्हिड कालावधीमध्ये बहुमोल योगदान दिलेल्या स्वयंसेवी संस्थांचा सत्कार होईल.

स्वच्छता व पर्यावरणविषयक जनजागृतीपर प्रभातफेरी, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूल येथे शाळेच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम व सर्व विद्यार्थ्यांसमोर प्लास्टिकमुक्तीवर गीत सादर केले जाणार आहे. तसेच प्राथमिक शिक्षण समितीकडील सर्व शाळांमध्ये विविध विषयांवर शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या सर्व रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे व कुटुंब कल्याण केंद्रांच्या ठिकाणी सकाळी 8 ते 2 पर्यंत मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर होणार आहे. पाणीपुरवठा व ड्रेनेज मोफत भागाच्या प्रधान कार्यालय येथे रक्तदान शिबिर व पाणी वाचविण्याबाबतची जलदिंडी महापालिका चौकातून बिंदू चौक ते छ. शिवाजी चौक या मार्गावरून काढण्यात येणार आहे. के.एम.टी.च्या वतीने महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शहरातील ऐतिहासिक स्थळांची भेटी दिल्या जाणार आहे.

17 डिसेंबर रोजी केशवराव भोसले नाट्यगृह येथे दिव्यांगासाठी गीत गायन, नृत्य, एकांकिका, नाटीका, प्रबोधनात्मक भाषण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 24 व 25 डिसेंबर रोजी सासणे, मैदान ताराबाई पार्क येथे दुपारी 3 ते रात्री10 पर्यंत फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT