कोल्हापूर

कोल्हापूर : महा ई-सेवा, ग्रामपंचायतींच्या उदासीनतेचा फटका

Arun Patil

कोल्हापूर, डॅनियल काळे : आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड योजना अर्थातच प्रधानमंत्री जन- आरोग्य योजनेसाठी समाविष्ट लाभार्थ्यांची गोल्ड कार्ड बनविण्यात विविध पातळींवर उदासीनता दिसून येत आहे. ग्रामपंचायती, महा ई-सेवा केंद्रे, आपले सरकार सेवा केंद्रे, तसेच ज्या रुग्णालयांचा समावेश आहे. अशा रुग्णालयांना ही कार्ड बनविण्याची सुविधा दिली आहे. जिल्ह्यात अशी 2500 केंद्रे आहेत. परंतु, त्यांनी याबाबतीत अद्याप पर्यंत उदासीनताच दाखविल्याने त्याचा फटका या योजनेला बसत आहे. जनकल्याणकारी योजना असूनही लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत.

आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखांचे उपचार मोफत होणार आहेत. या योजनेतील संभाव्य लाभार्थ्यांची यादी 2011 सालच्या सामाजिक, आर्थिक पाहणीतून करण्यात आली आहे. यापैकी बरेच पात्र लाभार्थ्यांना या यादीत त्यांचे नाव आहे. याची माहिती नाही की, योजनेची माहिती नाही. बर्‍याच आरोग्यसेवकांनी अथवा आरोग्य विभागातून त्याना निरोप देऊन बोलविण्यात येते. तरीदेखील ते जात नाहीत. त्यामुळे आधार गोल्डन कार्ड योजनेत समाविष्ट लाभार्थ्यांची संख्या काही केल्या वाढायला तयार नाही. योजनेचे महत्त्व लोकांना कळाल्याशिवाय हा प्रतिसाद वाढणार नाही.

आजारी पडल्यावर बघू

तहान लागली की विहीर खणायची अशी एक म्हण आपल्याकडे आहे. या म्हणीचा प्रत्यय ही कार्ड बनविताना येत आहे. अनेक लाभार्थ्यांना तुमचे नाव यादीत आहे. तुम्ही कार्ड काढायला या, असे सांगूनही ते येत नाहीत. आता कुठे आम्ही आजारी आहोत. जेव्हा आजारी पडू तेव्हा बघू, असे म्हणून आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना टाळले जात आहे. आजारी पडले की मग याच्या दारात जा, त्याच्या दारात जा असे करण्याची वेळ येते. परंतु हे कार्ड असेल तर कोणाच्याही दारात जाण्याची गरज नाही. एक पैसाही न देता दरवर्षी पाच लाखांपर्यंतचे उपचार होणार आहेत. त्यासाठी कोणाच्याही हाता-पाया पडण्याची गरज नाही.

20 ते 30 रुपयांत कार्ड निघणार

महा ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रातून अवघ्या 20 ते 30 रुपये इतक्या खर्चात हे कार्ड निघणार आहे. पहिल्यांदा नाव शोधायचे, नाव असेल तर पुढची प्रक्रिया करून गोल्डन कार्ड निघणार आहे. आयुष्यभर त्याचा फायदा त्या कुटुंबाला मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही जागृकता दाखविण्याची गरज आहे.

SCROLL FOR NEXT