कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
आगामी पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज केली आहे. तीन दक्षता पथके स्थापन केली आहेत. आरोग्य विभाग विभागीय कार्यालये, अग्निशमन दल, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग अशा सर्वच विभागांशी संवाद साधून आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला आहे. आराखड्यानुसार अग्निशमन विभागातर्फे तीन दक्षता पथके तयार केली आहेत. शहरातील सुमारे साडेपाच लाख लोकसंख्येचा विचार करून संभाव्य नियोजन केले आहे. नाले सफाईचे काम पूर्ण झाले आहे.
प्रत्येक विभागीय कार्यालयात वैद्यकीय पथक
महापालिकेची चार विभागीय कार्यालये आहेत. नागरिकांना पूरस्थितीत वैद्यकीय मदत तातडीने मिळण्यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयामध्ये वैद्यकीय पथक तैनात केले आहे. पूरस्थितीत पाणीपुरवठ्याचे नियोजन पूरस्थितीत पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. या काळात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास तातडीने उपाययोजना करण्यासाठी अधिकारी नेमले आहेत. शिंगणापूर उपसा केंद्र पाण्यात जात असल्याने बालिंगा केंद्रावरून बहुतांश भागांत पाणीपुरवठा केला जाणार आहे. ई वॉर्डमध्ये पाणीपुरवठ्यासाठी टँकरचे नियोजन केले आहे.
मोटार बोटीसह यंत्रणा सज्ज
अग्निशमन विभागाकडे 13 मोटार बोटी, 80 लाईफ जॅकेट, 70 फायबर रिंग आदींसह वृक्षांची पडझड होताच रस्ता मोकळा करण्यासाठी कुर्हाडी, कटर मशिन आदी यंत्रणा सज्ज आहे. पूरग्रस्तांना विस्थापित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. प्रत्येक विभागीय कार्यालयात अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे.
पाणी साचणारी ठिकाणे
व्हिनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, शाहूपुरी कुंभार गल्ली, सुतारवाडा, राजारामपुरी जनता बाजार चौक, पार्वती टॉकीज चौक, टाकाळा खण परिसर, सुदर्शन कॉलनी परिसर, शाळा नंबर 9 परिसर, सरनाईक कॉलनी परिसर, स्वातंत्र्य सैनिक वसाहत, हडको कॉलनी, अहिल्याबाई होळकरनगर, कणेरकरनगर, देवकर पाणंद चौक, हरिप्रिया नगर पत्तौडी घाट खणीजवळ, रामानंदनगर, जगतापनगर, रायगड कॉलनी आदींसह विविध संभाव्य पाणी साचणार्या ठिकाणांवर यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
आरोग्य विभागाचे स्वतंत्र पथक
आरोग्य घनकचरा, व्यवस्थापन या विभागातर्फे कचरा उठाव आणि दवाखान्यांची सज्जता ठेवण्यासाठी आरोग्य विभागाचे स्वतंत्र पथक तैनात केले आहे. चारही विभागीय कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. प्रत्येक विभागीय कार्यालयाच्या अखत्यारीत पाणी साचणारी ठिकाणे निश्चित केली आहे. तसेच पुराचे पाणी येताच तेथील स्थलांतरीत नागरीकांसाठी निवार्याची ठिकाणेही निश्चित केली आहे.