कोल्हापूर

कोल्हापूर : भोंगा वाजताच अनेकांना आठवणीने गहिवर

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शाहू महाराज यांनी दूरदृष्टीने सुरू केलेली शाहू मिल राजकीय अनास्थेमुळे 2003 मध्ये बंद पडली. मात्र, शाहू जयंतीनिमित्ताने रविवारी शाहू मिलची अस्मिता असणारा भोंगा वाजताच उपस्थितांसह निवृत्त कामगारांना गहिवरून आले. अनेकांना अश्रू रोखता आले नाहीत. मावळा कोल्हापूर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून हा भोगा वाजविण्याचे नियोजन केले होते. सर्वपक्षीय कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

शाहू मिल पुन्हा सुरू व्हावी, या हेतूने कार्यकर्ते धडपडत आहेत. याचाच एक भाग म्हणून शाहू जयंतीनिमित्त शाहू मिलची अस्मिता असणारा भोंगा पुन्हा वाजविण्याचे नियोजन केले होते. मावळा कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष उमेश पवार यांच्या पुढाकाराने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वत: वर्गणी जमा करून एक लाख रुपये खर्च करून हा भोंगा वाजविण्याचे नियोजन केले. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

मशिनचे पूजन करून भोंग्याचे बटन दाबण्यात आले. बटन दाबताच भोंग्याचा आवाज परिसरासह सर्वदूर पोहोचला. 27 सप्टेंबर 1906 रोजी छत्रपती शाहू महाराज यांनी प्रथम भोंगा वाजवून मिलची स्थापना केली. त्यानंतर 31 ऑगस्ट 2003 रोजी शेवटचा भोंगा वाजला. तब्बल 19 वर्षांनंतर भोंगा वाजल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. भोंगा वाजताच अनेक कामगारांसह उपस्थितांनाही अश्रू आवरता आले नाहीत.

यावेळी मालोजीराजे, आर. के. पोवार, बाबा पार्टे, अ‍ॅड. बाबा इंदुलकर, वसंत मुळीक, उमेश पवार, प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, सुनील कदम, शिवाजीराव कवाळे, अशोक भंडारे, दुर्गेश लिंग्रस, प्रतिज्ञा उत्तुरे, आदिल फरास, मावळा कोल्हापूरचे युवराज पाटील आदींसह निवृत्त कामगार, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT