कोल्हापूर

कोल्हापूर : बाल स्केटिंगपटू अनुष्का रोकडेचा विक्रम

सोनाली जाधव

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
पहाटेचा वारा, झिरमीर पावसाच्या सरी आणि कोवळे ऊन अशा वातावरणात सांगली ते कोल्हापूर हे सुमारे 50 कि.मी. अंतर अवघ्या 2 तास 46 मिनिटांत पूर्ण करण्याचा विक्रम 9 वर्षीय लहानगी स्केटिंगपटू अनुष्का कविराज रोकडे हिने 'नॅशनल बुक'मध्ये आपल्या नावावर नोंद केला.
अ‍ॅमॅच्युअर कोल्हापूर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण केंद्राची स्केटर व न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी अनुष्का हिने गुरुवारी ही कामगिरी केली. सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास अभिवदनाने सकाळी साडेपाच वाजता विक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे उपमहापौर उमेश पाटील, राष्ट्रीय स्केटिंग कोच मयूर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सांगली-कोल्हापूर रोडवरील खड्डे, वाहनांची गर्दी, अडथळे पार करत आलेल्या अनुष्काचे ताराराणी चौकात जंगी स्वागत टाळ्या-शिट्ट्या आणि फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यात आले. यानंतर तिला नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र- स्मृतिचिन्ह व पाच हजारांचे बक्षीस राष्ट्रवादीचे राजू लाटकर, भाजपचे अ‍ॅड. अद्वैत सरनोबत व प्रशिक्षक महेश कदम यांच्या हस्ते देण्यात आले. मुलीच्या कौतुकाने अनुष्काच्या आई प्रियाराणी व वडील कविराज यांना आनंदाश्रू लपविता आले नाहीत. यावेळी 'बीएसएनएल'चे अधिकारी दत्तात्रय कोळी, राजू पाटील, अरविंद मेढे, जयप्रकाश पाटील, तानाजी रोकडे, विजय रोकडे, राजेंद्र आगळे आदी उपस्थित होते. अनुष्काला विक्रमवीर प्रशिक्षिका तेजस्विनी कदम, धनश्री कदम, भास्कर कदम, योगेश रोकडे यांचे मार्गदर्शन लाभले.

SCROLL FOR NEXT