कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत गुरुवारी झालेले प्रॅक्टिस – जुना बुधवार व उत्तरेश्वर विरुद्ध रंकाळा सामना बरोबरीत सुटला. चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात चारही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
प्रॅक्टिस फुटबॉल क्लब आणि संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यातील सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागून होते. सामना शेवटपर्यंत चुरशीने खेळला गेला. दोन्ही संघांकडून चढाया करण्यात आल्या, पण गोलची नोंद झाली नाही. प्रॅक्टिस क्लबच्या अमित बिश्वास तर जुना बुधवारच्या अब्दुल्ला अन्सारी यांनी गोल रोखले, त्यामुळे सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.
प्रॅक्टिस क्लबकडून प्रणव कणसे, सागर चिले, रोहित भोसले, सागर पोवार यांनी तर जुना बुधवारकडून अभिषेक भोपळे, रिचीमाँड, आकाश मोरे यांनी गोलसाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. चुकीच्या पद्धतीने खेळी केल्याने जुना बुधवारच्या महेश जगताप याला एकाच सामन्यात दोनवेळा यलो कार्ड मिळाले. त्यानंतर त्याला रेडकार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले.
दुसरा सामना उत्तरेश्वर विरुद्ध रंकाळा हा देखील सामना 1-1 बरोबरीत सुटला. रंकाळा तालीमकडून हर्ष जरगने 12 व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. उत्तरेश्वर संघाने यानंतर जोरदार चढाया केल्या. 57 व्या मिनिटाला स्वराज्य पाटील याने त्या गोलची परतफेड केल्याने हा सामना 1-1 अशा बरोबरी सुटला.