कोल्हापूर; डॅनियल काळे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून शहरालगतच्या गांधीनगर, उचगावसह 9 गावे व उपनगरांना पाणीपुरवठा केला जातो; पण या योजनेमुळे संबंधित गावांवर वाढीव पाणीपट्टीचा दुप्पट बोजा पडत आहे. या पाणीपट्टीच्या बोजाने नागरिक आणि ग्रामपंचायतींचे अर्थिकद़ृष्ट्या कंबरडे मोडत आहे. पाणी पुरवठ्याच्या बाबतीत ग्रामीण निकष आणि पाणीपट्टी मात्र शहरापेक्षा दुप्पट दराने आकारली जात आहे. त्यामुळे ही महागडी योजना माथी मारल्याचा आरोप ग्रामस्थांतून होऊ लागला आहे.
खर्चावर आधारित बिलाची आकारणी होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी, कर्माचार्यांचे वेतन, वीज बिले, जलशुद्धीकरणाचा खर्च असा सर्वच बोजा या योजनेत समाविष्ट गावांना सहन करावा लागत आहे. ही सर्व गावे शहरालगतची आहेत. पाण्यासाठी वणवण सहन केलेली आहेत. त्यामुळे पर्यायच नसल्याने महागडे पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.पांढरा हत्ती पोसल्यासारखे ग्रामस्थ ही योजना पोसत आहेत.
कोल्हापूर शहरालगतच्या या गावांना पाण्याचा खूपच मोठा प्रश्न भेडसावत असल्याने तत्कालीन युती शासनाने 1997 ला गांधीनगर योजनेची पायाभरणी केली. त्यावेळी या योजनेला 20 कोटींचा निधी मंजूर केला होता. योजना पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदेने ही योजना ताब्यात घेतली नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ही योजना ठेकेदारांमार्फत आणि त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत चालविली जात आहे. बहुतांश ग्रामपंचायती या कनेक्शनधारकांकडून पाणीपट्टी वसूल करतात. काही ठिकाणी थेट जीवन प्राधिकरण पाणीपट्टी वसूल करते. गांधीनगर योजनेत समाविष्ट गावांना दर हजार लिटरला 18 रुपये इतक्या दराने पाणीपट्टी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आकारली जाते. पाणीपुरवठा मात्र ग्रामीण निकषांप्रमाणे दरडोई 55 लिटर याप्रमाणे केला जातो. त्यामुळे महागड्या दराचे पाणी पिण्याची वेळ आली आहे.
याशिवाय योजनेतील गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढत गेल्यामुळे 2030 पर्यंत अपेक्षित धरलेली 1 लाख 40 हजारांचा टप्पा या गावांनी केव्हाच ओलांडला असून सद्यस्थितीत या गावांची लोकसंख्या 2 लाख 4 हजार इतकी आहे.त्यामुळे पाण्याचा तुटवडाही जाणवत असून काही गावांना दिवसाआड रोज 45 मिनिटे, तर काही गावांना दोन ते तीन दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. सलग 16 तास पाण्याचा उपसा करूनही अपुरा पाणीपुरवठा होतो शिवाय महागडे पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.
1) गांधीनगर ………..17,500
2)वळिवडे…………..15,965
3)गडमुडशिंगी……….29,150
4)उचगाव…………..48,347
5)उजळाईवाडी………14,800
6)कणेरी…………….7926
7) गोकुळ शिरगाव…..27,600
8) मोरेवाडी………….11,000
9) पाचगाव………….31,754