कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील आणखी पाच गावांना पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी 6 कोटी 99 लाख 42 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. जलसंपदा विभागाने हा निधी दिला आहे.
पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीवर पाटपन्हाळा येथे पूरसंरक्षक भिंत (घाट) बांधण्यासाठी 74 लाख 75 हजार 399 रुपयांचा तर बांद्रेवाडीसाठी 71 लाख 62 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. भुदरगड तालुक्यातील वेदगंगा नदीवर कलनाकवाडी येथील भिंत बांधण्यासाठी 1 कोटी 61 लाख 74 हजार 444, मडिलगे खुर्द येथे 1 कोटी 50 लाख 20 हजार 353 रुपये तर खानापूर येथे 2 कोटी 41 लाख 10 हजार 111 रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यापूर्वी निळपण येथे भिंत बांधण्यास निधी मंजूर झाला आहे.
नदीप्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊन हे काम केले जाणार आहे. या कामासाठी कोणत्याही प्रकारे भूसंपादन करू नये, जमीनीची आवश्यकता असल्यास ती विनामोबदला उपलब्ध करून द्यावी असे आदेशही देण्यात आले आहेत. यानंतर हे काम जिल्हा परिषदेने ताब्यात घ्यावी असेही आदेशात म्हटले आहे.
जिल्ह्याला आतापर्यंत 11 कोटी 44 लाखांचा निधी
जलसंपदा विभागाने पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी जिल्ह्याला आतापर्यंत एकूण 11 कोटी 44 लाख 86 हजार 993 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सर्वाधिक निधी निळपण (ता. भुदरगड) या गावासाठी देण्यात आला आहे. या गावात पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी 4 कोटी 47 लाख 44 हजार रुपयांचा निधी दिला आहे. दि.1 फेब—ुवारीला निधी मंजुरीचा आदेश काढला आहे.
पूरसंरक्षक भिंती का?
जिल्ह्यात दरवर्षी दमदार पाऊस होतो. दरवर्षी जिल्ह्यातील 129 गावे पूरबाधित होतात. 2019 व 2021 साली जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसला. या कालावधीत पूरबाधित गावांची संख्या 391 वर गेली. या गावातील नदीकाठावरील जमीनींचे पुराने मोठे नुकसान झाले आहे. शहरी भागातही नदी, नाल्याकाठावरील भागांचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्याने जमीन वाहून जाण्याचे प्रकार दरवर्षी वाढत आहेत. त्यातून पाणी पसरण्याचा धोका वाढत चालला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर दरवर्षी पुराच्या पाण्याने होणारे नुकसान कमी करण्यासाठी पूर संरक्षक भिंत बांधण्याची घोषणा तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी केली.