कोल्हापूर

कोल्हापूर : पानसरे खून खटल्यात पंचाची साक्ष

सोनाली जाधव

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा, ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यात गुरुवारी पानसरे यांच्या खुनाचा उद्देश स्पष्ट करणारे पुरावे न्यायालयात सादर करून पंच साक्षीदाराचा सरतपास घेण्यात आला. बचाव पक्षामार्फत शुक्रवारी (दि. 8) उलट तपासणी होणार आहे. तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. पंच साक्षीदाराने जप्त पुस्तके, डायरी ओळखल्याचे न्यायालयात सांगितले.

विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांनी जप्त वस्तू न्यायाधीशांसमोर सादर करून त्याबद्दल साक्षीदारांना प्रश्न विचारले. संशयित आरोपी समीर गायकवाड याच्याकडील पुस्तकांमध्ये सनातन संस्था, सनातन धर्म, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याबद्दलची माहिती मिळाली. धर्मविरोधी विचार संपवण्यासाठी कृती करण्याची गरज असल्याचा मजकूर त्यात होता, अशी साक्ष पंच साक्षीदारांनी नोंदविली आहे. गोविंद पानसरे यांच्या खुनानंतर पहिला संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याला पोलिसांनी सांगलीतून अटक केली होती. त्याच्या घरात जप्त केलेल्या 68 वस्तूंची तपास अधिकार्‍यांनी पडताळणी केली. समीर गायकवाड याच्या घरात पोलिसांना चॉकलेटी रंगाची डायरी मिळाली होती. त्या डायरीत 'रुद्र पाटील याच्या झेरॉक्ससाठी केलेला खर्च', असा उल्लेख पोलिसांना आढळला होता. रुद्र पाटील हा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रेकॉर्डवरील फरार संशयित आरोपी आहे.

संशयिताच्या घरातून जप्त केलेल्या वस्तूंमधून गुन्ह्याचा उद्देश स्पष्ट होत असून, तो न्यायालयात मांडण्याचा प्रयत्न केला. बचाव पक्षाच्या वतीने शुक्रवारी साक्षीदाराची उलट तपसाणी होईल, अशी माहिती विशेष सरकारी वकील निंबाळकर आणि राणे यांनी दिली. यावेळी बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. अनिल रुईकर, अ‍ॅड. प्रीती पाटील उपस्थित होते. बंगळूर कारागृहातील संशयितांनी व्हीसीद्वारे सुनावणीला उपस्थिती लावली, तर पुण्यातील येरवडा कारागृहातील संशयित आरोपी न्यायालयात उपस्थित होते. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी पंच साक्षीदाराचा सरतपास घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT