कोल्हापूर

कोल्हापूर : पाणीपुरवठा योजनेच्या देखभालीकडे दुर्लक्ष

Arun Patil

कोल्हापूर, डॅनियल काळे : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शिंगणापूर योजनेच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. थेट पाईपलाईनचे पाणी येणार असल्याने या योजनेकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. हे उपसा केंद्र दोनवेळा महापुराच्या पाण्यात गेल्यामुळे हे पंप सतत नादुरुस्त होतात. या पंपांनाही गळती लागलेल्या आहेत. पंधरा वर्षे पंपांची मर्यादा होती. आता हे पंप कालबाह्य झाल्याने कोणत्याही क्षणी ते बंद पडण्याची शक्यता आहे. नागदेववाडीच्या उपसा केंद्राची तर बिकट स्थिती आहे. हे उपसा केंद्र ढासळण्याच्या स्थितीत आहे. याकडे वेळीच लक्ष देेणे गरजेचे असून शहराला पाणीपुरवठा करणार्‍या या योजना बेभरवशाच्या ठरत आहेत.

कोल्हापूर शहरातील ई वॉर्डसह अन्य शहरालाही शिंगणापूर योजनेतून पाणीपुरवठा केला जातो; पण शिंगणापूर योजनेचे जे उपसा केंद्र आहे, ते दोनवेळा महापुरात गेल्यामुळे येथील पंप नादुरुस्त होत आहेत, तसेच ठिकठिकाणी गळतीही लागली आहे. या ठिकाणी नवे पंप बसविण्याची गरज आहे. एखाद्या जादा पंपाचीही आवश्यकता आहे; पण याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शिंगणापूरचे पंपिग स्टेशन केव्हाही बंद पडण्याचा धोका आहे.

नागदेववाडी उपसा केंद्र ढासळण्याच्या स्थितीत

नागदेववाडी उपसा केंद्रातून बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. परंतु, नागदेववाडी उपसा केंद्र सध्या बिकट स्थितीत आहे. हे पंपिंग स्टेशन कोणत्याही क्षणी ढासळण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा केंद्राने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

पाण्याची तपासणीही वेळेवर होत नाही

बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी बाहेर पडण्यापूर्वी त्याची तपासणी होणे आवश्यक आहे. परंतु, या तपासणीकडेही दुर्लक्ष केले जात आहे. ज्या लॅबकडे पाण्याचे नमुने दिले जातात त्यांच्याकडून पाण्याचे अहवाल यायला वेळ लागतो. त्यामुळे तपासणीपूर्वीच हे पाणी वितरित केले जाते. त्यामुळे प्रदूषित पाण्याचा धोकाही कायम आहे.

शिंगणापूर योजनेचे अस्तित्व टिकवायला हवे

थेट पाईपलाईन होणार असल्याने सध्याच्या योजनांकडे दुर्लक्ष केले जात आहे; परंतु शिंगणापूर योजना टिकायलाच हवी. भविष्यात थेट पाईपलाईन योजनेत काही अडचणी निर्माण झाल्यास, पाणीपुरवठा थांबला तर पर्याय म्हणून शिंगणापूर योजनेतून पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे ही योजना टिकायला हवी. त्यासाठी देखभाल आणि दुरुस्तीकडे लक्ष द्यायला हवे.

बालिंगा जलशुद्धीकरण केंद्र गाळाने भरलेले

बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ गेल्या सात वर्षांपासून काढलेला नाही. त्यामुळे हे जलशुद्धीकरण केंद्र गाळाने भरलेले आहे. येथून चंबुखडी टाकीपर्यंत पाणी जाण्याच्या ठिकाणी पाईपलाईनला तसेच जलशुद्धीकरण केंद्रालाही मोठी गळती आहे. त्यामुळे पाणी उपसा आणि वीज बिलापोटीही मोठा खर्च होत आहे. या गळती कधी काढणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

SCROLL FOR NEXT