रंकाळा  
कोल्हापूर

कोल्हापूर : पर्यावरण मंत्र्यांच्या पाहणीनंतरही रंकाळा प्रदूषण ‘जैसे थे’!

सोनाली जाधव

कोल्हापूर : आशिष शिंदे
पंचगंगा नदीपाठोपाठ कोल्हापूरच्या सौंदर्याचे मुख्य आकर्षण असणारा ऐतिहासिक रंकाळा तलावदेखील प्रदूषणाच्या विळख्यात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी स्वत: पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी रंकाळा तलावाला भेट देऊन, तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असणार्‍या कामांचा आढावा घेतला होता. मात्र, यानंतरही रंकाळ्याचे प्रदूषण 'जैसे थे' आहे. अनेकवेळा थेट तलावात सोडले जात असलेले सांडपाणी तसेच मोठ्या प्रमाणात जनावरे आणि कपडे रंकाळ्यात धुतले जात असल्याने पाण्याची गुणवत्ता ढासळत चालल्याचे पर्यावरण तज्ज्ञांंनी सांगितले.

हिरवेगार पाणी, शेवाळ, दुर्गंधी, मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेला कचरा यामुळे वैभवशाली सौंदर्य असणार्‍या रंकाळा तलावाचे अक्षरश: विद्रूपीकरण झाले आहे. विवेकानंद कॉलेजच्या वतीने रंकाळा तलावाच्या पाण्याचे शनिवारी सहा ठिकाणांवरून नमुनेे घेतले होते. यामध्ये चौपाटी परिसरातील पाण्याचा पीएच काही प्रमाणात वाढला असल्याचे प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी सांगितले, तर इतर ठिकाणी तलावाच्या पाण्याची गुणवत्ता उत्तम होती. रंकाळा तलावामध्ये मिसळणारे सांडपाणी रोखण्यात आल्याचा दावे करण्यात आले असले तरी, आजही काही प्रमाणात सांडपाणी थेट तलावात मिसळत आहे. वळवाचा पाऊस झाल्यानंतर क्रशर चौकातील नाला तसेच न्यू रंकाळा येथील नाल्यातून सांडपाणी तलावात मिसळत असल्याचे चित्र आहे.

रंकाळा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात कपडे, जनावरे धुतली जातात. त्यामुळे सर्वाधिक प्रदूषण होत आहे. याशिवाय अवकाळी-वळवाचा पाऊस झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सांडपाणी थेट तलावात मिसळते. यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

– उदय गायकवाड (पर्यावरण अभ्यासक)

वॉश आऊटची गरज

रंकाळा तलावाचे पाणी वॉश आऊट करण्याची गरज असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितले. गेली काही वर्षे तलावाचे पाणी वॉश आऊट न केल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पाण्याचे सर्व विसर्ग खुले करून पावसाचे पाणी साठवणे गरजेचे आहे. दरवर्षी ही प्रक्रिया राबविल्यास प्रदूषण नियंत्रणात राहण्यास नक्‍कीच मदत होईल.

रंकाळा तलावाच्या पाण्याची गुणवत्ता सुधारत आहे. पावसाळ्यात रंकाळा तलावाचे शाहूकालीन व्हॉल्व्ह उघडून पाणी ड्रेन करून, पावसाचे नवीन पाणी तलावात साठवण्यात येईल. यामुळे तलावाच्या पाण्याची गुणवत्ता आणखी सुधारण्यास मदत होईल.
– समीर व्याघ्यांब-े
(पर्यावरण अधिकारी, मनपा)

स्थानिकांसह पर्यटकही जबाबदार

रंकाळा तलावाला पर्यटक भेट देत असतात. मोठी चौपाटी असल्याने फेरीवाल्यांची संख्यादेखील जास्त आहे. मात्र, बर्‍याचदा पर्यटकांसह स्थानिक नागरिकही खाद्यपदार्थ, प्लास्टिक रॅपर, गुटखा-माव्याच्या पुड्या, पाण्याच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या याशिवाय घरात नको झालेल्या वस्तू थेट रंकाळ्यात आणून टाकल्या जातात. यामुळे रंकाळ्याचे विद्रूपीकरण होत आहे. याशिवाय फेरीवाल्यांनी देखील जबाबदारी घेऊन कचरा तलावात न टाकता त्याचे संकलन करून योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT