कोल्हापूर; चंद्रशेखर माताडे : राजकीय उलथापालथीत बळी जातो तो कार्यकर्त्यांचाच. नेत्यांच्या साठमारीत कार्यकर्त्यांची फरफट होते. मात्र, ना त्याची कोणाला काळजी, ना त्याची फिकीर, अशी भावना कार्यकर्त्यांत वाढली आहे.
पूर्वीच्या काळी तालमी हे प्रत्येक गल्लीचे शक्तिस्थान होते. या तालमींच्या ताकदीच्या जोरावर अनेकांनी नेतृत्व केले. तालमीतील नेते तेच तेच राहिल्याने तरुणांना मर्यादित वाव होता. त्यामुळे तालमीतून बाहेर पडून तरुणांनी मंडळे काढली आणि ही मंडळे तालमींना मागे टाकत राजकारणाची नवी शक्तिकेंद्रे बनली.
कोणाला नोकरीची गरज, कोणाला व्यवसायातील अडचण, कोणाची जमीन प्रकरणे लटकलेली तर कोणाला पैसा आहे; पण मिरवायचं, असे अनेक गरजू तरुण मंडळातून वावरतात. याच तरुण मंडळांच्या ताकदीचा वापर करून नेते आपले नेतृत्व शाबूत ठेवतात. अनेकदा नेत्यांकडूनच नको असलेल्या मंडळांचा दुसर्या मंडळाला हाताशी धरून काटा काढण्याचे प्रकार नवे नाहीत.
मंडळांमधील ईर्ष्या नेत्याच्या ताकदीच्या बळावर वाढते. मध्यंतरी कोल्हापुरात डॉल्बीचे पेव फुटले, तर डॉल्बी थांबविण्याचे नवेच प्रस्थ कोल्हापुरात आकाराला आले. यामागे दोन नेत्यांमधील ईर्ष्या कारणीभूत होती, हे लपून राहिले नाही.
नेते ज्या ज्यावेळी कार्यकर्त्यांना हाताशी धरतात, तेव्हा त्यांची ती आत्यंतिक गरज असते किंवा आपल्या प्रतिस्पर्धी नेत्याला त्यांना मात द्यायची असते. मात्र, या प्रकारात कार्यकर्त्यांची होणारी फरफट त्यांना झुंजवणारे नेते कधीच लक्षात घेत नाहीत.
निवडणूक, मग ती ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत कोणतीही असो. कार्यकर्त्यांची गरज ठरलेली. याच गरजेपोटी कार्यकर्त्यांना वापरले जाते. नेते गरज संपली की, त्यांना सोयीस्करपणे एकतर विसरतात किंवा दुर्लक्ष करून बाजूला करतात. सोयीच्या कार्यकर्त्याला पुढे आणण्यासाठी आपल्या जवळच्या कार्यकर्त्याचाही बळी दिल्याची अनेक उदाहरणे आहेत.
काही गावांत पक्ष नावालाच. सगळी लढाई गटा-तटातच. हे गट एवढे टोकाला गेलेले की, एकमेकांचे नातेवाईक असले तरी दुसर्या गटात सोयरिक करायची नाही, हा तिथला अनेक वर्षे अलिखित नियम होता. त्याचबरोबर निवडणूक कुठली असली तरी गावातील काही घरांची कौले निकालानंतर फुटायचीच हे ठरलेले. हे चित्र अलीकडे बदलले.
अशीच ईर्ष्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावाने अनुभवली आहे. निवडणुकीनंतर होणार्या हाणामार्या, परस्परविरोधी तक्रारी यातून वैमनस्य ठरलेले असायचे.
पक्षासाठी, गटासाठी आणि नेत्यांसाठी कार्यकर्त्यांनी जिवापाड मेहनत घ्यायची आणि नेत्यांनी पक्ष बदलला किंवा त्यांनी आघाडी बदलली तर कार्यकर्त्यांची होणारी कोंडी आणि त्यातूनच त्यांची होणारी फरफट फार कमी नेत्यांनी जाणली. परस्पर विरोधी नेते एकत्र येतात, तेव्हा निवडणुकीत किंवा सामाजिक कार्यक्रमात नेत्यांसाठी एकमेकांना खुन्नस देणार्या कार्यकर्त्यांची मनं कधी जुळतच नाहीत. त्यातूनच मग किरकोळ कारणावरून हाणामार्या होतात.
आताही जिल्ह्यात पुन्हा एकदा नेत्यांनी पक्षाशी फारकत घेण्याचा प्रकार घडला आहे. राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर व शिरोळचे आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिवसेनेचे नेतृत्व झुगारून देत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व पसंत केले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन अडीच वर्षे झाली; पण कार्यकर्त्यांना कुठेही महामंडळ किंवा सरकारी कमिट्यांवर स्थान मिळाले नाही. नेते सत्तेवर बसले. दहा आमदार झाले, दोन खासदार झाले, तिघे मंत्री झाले. मात्र, कार्यकर्त्यांना काय मिळाले? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. आता नेत्यांमध्येच साठमारी सुरू झाली आहे. मात्र, मोठ्या अपेक्षेने नेत्यांमागे जाणार्या कार्यकर्त्यांची फरफट सुरूच आहे.