कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा नियोजनमधून मंजूर झालेला निधी परत जाणार नाही याची दक्षता घ्या, ही कामे गतीने पूर्ण करा, त्यासाठी काटेकोर नियोजन करा, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी सर्व यंत्रणेला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात त्यांनी आढावा बैठक घेतली. सोमवारी (दि.9)पुन्हा आढावा घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केसरकर म्हणाले, कोल्हापूर पर्यटन विकास कामांतर्गत सर्व संबंधित विभागांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे कामे करावीत. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडाअंतर्गत पार्किंगचे काम संथगतीने सुरू आहे, त्याची गती वाढवावी. ज्या कामांना निधी प्राप्त आहे ती कामे प्रथम पूर्ण करून, मग अन्य कामांना सुरुवात करा.
अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा व परिसर विकास करणे, पंचगंगा नदीकाठ संवर्धन व विकास करणे, शिवाजी पुलाचा पर्यटन विकास, शाहू मिल परिसर विकास आराखडा, जुना राजवाडा संवर्धन व विकासकामे, कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक वारसास्थळांना जोडणारा हेरिटेज पथ तयार करणे, वन क्षेत्रातील प्रलंबित विकासकामे आदी बाबीअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला.
यावेळी माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने पालकमंत्री केसरकर यांनी मेजर सुधीर सावंत व अन्य माजी सैनिकांची भेट घेतली व त्यांचे विविध प्रश्न व मागण्यांच्या अनुषंगाने शासन सकारात्मक असेल, असे त्यांनी सांगितले. त्यांचे विविध प्रश्न व मागण्या विषयनिहाय जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांच्यासह नियोजन समितीचे सदस्य व अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.