कोल्हापूर, प्रवीण मस्के : विद्यार्थ्यांना पायाभूत गणित आले पाहिजे, यासाठी राष्ट्रीय स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भाषा व गणित विषयाला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्षापासून 3 ते 9 वर्षे वयोगटसाठी 'निपुण' भारत अभियान सुरू होणार आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या बुद्धी व भाषेचा विकास होण्यास मोठा हातभार लागणार आहे.
तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी मद्रास येथील कार्यक्रमात 22 डिसेंबर हा गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्याची फेब्रुवारी 2012 मध्ये घोषणा केली. त्यानुसार दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. कोरोना काळात शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्याचबरोबर गणित विषयाचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांनी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने प्राथमिक स्तरावर 2026-27 पर्यंत विद्यार्थ्यांना मूलभूत भाषिक व गणिताची कौशल्ये प्राप्त करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
केंद्र सरकारने समग्र शिक्षा अभियानामध्ये निपुण भारतचा समावेश केला आहे. यासाठी कृती आराखडा तयार करणे, विषय सूचीनुसार प्राधान्यक्रम ठरवले जाणार आहेत. दैनंदिन प्रश्न सोडविण्यासाठी साध्या संकल्पना, वापर करण्याची क्षमता, संख्या पूर्वकल्पनेचा विकास, तुलना करण्याचे ज्ञान व कौशल्ये, आकृतीबंध व त्याचे वर्गीकरण या गोष्टींच्या आधारे गणित अध्ययनाचा पाया घातला जाणार आहे.