कोल्हापूर

कोल्हापूर: नवरात्रौत्सवापासून देवस्थानचा ‘वृक्ष प्रसाद’

मोनिका क्षीरसागर

कोल्हापूर; अनिल देशमुख: येत्या नवरात्रौत्सवापासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती 'वृक्ष प्रसाद' सुरू करणार आहे. मंदिरात भाविकांना करवीर निवासिनी अंबाबाईच्या एका हातात असलेल्या 'म्हाळूंग' या फळाचे रोप प्रसाद म्हणून देणार आहे. याबाबतची प्राथमिक तयारी सुरू करण्यात आली आहे.

करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची अनेक वैशिष्ट्य आहेत. युद्धाच्या तयारीत असलेल्या या देवतेच्या एका हातात 'म्हाळूंग' हे फळ आहे. यामुळे या फळाला अन्ययसाधारण महत्त्व आहे. लिंबू वर्गीय असलेल्या या फळाचे आयुर्वेदिक महत्त्वही आहे. यामुळे या फळाची रोपे भाविकांना देण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे.

देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि प्रसिद्ध अभिनेते, वृक्ष चळवळीतील कार्यकर्ते सयाजी शिंदे यांची शनिवारी कोल्हापुरात बैठक झाली. या बैठकीत या नव्या उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा झाली. 'झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेश धार्मिक भावनेशी जोडून प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरेल, असा विश्वास आहे.

पहिल्या टप्प्यात अभिषेकासाठी येणार्‍या भाविकांना 'म्हाळूंग'चे रोप देण्याचा विचार होता. मात्र, त्यात खंड पडू नये याकरिता नवरात्रौत्सवापासून दररोज किमान शंभर रोपे भाविकांना देता येतील, या द़ृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. त्याकरिता आवश्यक रोपे तयार करण्यापासून त्याचे दैनंदिन वाटप याबाबत नियोजन करण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT