कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवातील जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रौत्सवही धामधुमीत होण्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी शहर, जिल्ह्यात बंदोबस्ताचे नेटके नियोजन केले आहे. गजबजलेल्या ठिकाणांसह प्रमुख मार्गांवरील हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेर्याची नजर असेल, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शहरातील चारही पोलिस ठाण्यांतर्गत उपलब्ध मनुष्यबळांसह अतिरिक्त फौजफाटाही पाचारण करण्यात येत आहे. शहर वाहतुकीसह वाहन पार्किंगसाठीही चोख नियोजन करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. महामार्गावरील तस्करी रोखण्यासाठी रात्रंदिवस नाकेबंदी करण्यात येईल. सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना ध्वनिक्षेपकासाठी रात्री 10 वाजेपर्यंतचे बंधन राहील. या निर्णयाचा कडक अंमल होईल, असेही त्यांनी सांगितले.
महालक्ष्मी मंदिर परिसरासह महाद्वार रोड, भाऊसिंगजी रोडवर सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वित आहे. त्यात आणखी 40 सीसीटीव्ही नव्याने बसविण्यात येत आहेत. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येत आहे. जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी पोलिस ठाण्यांतर्गत उपलब्ध मनुष्यबळांसह सुमारे साडेतीनशे ते चारशेवर पोलिसांची कुमक वाढविण्यात येत आहे. त्यात राज्य राखीव दलाचे जवानही पाचारण करण्यात आले आहेत.
रास दांडिया खेळात महिला, युवतींची छेडछाड होणार नाही, यासाठी महिला पोलिस अधिकार्यांची पथके नियुक्त करण्यात येत आहेत. याशिवाय साध्या वेशात पोलिसांचा फौजफाटा कार्यरत राहणार आहे. नवरात्रौत्सव काळात शांतता-सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणार्या समाजकंटकांवर कठोर कारवाईच्या सूचना जिल्ह्यातील प्रभारी अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत, असेही बलकवडे यांनी सांगितले.
महामार्गावरील तस्करी रोखण्यासाठी कागल, गोकुळ शिरगाव, गांधीनगर, शिरोली पुलाची तसेच वडगाव पोलिसांना रात्रंदिवस नाकाबंदी व वाहन तपासणीसाठी अलर्टच्या सूचना दिल्या आहेत.