कोल्हापूर

कोल्हापूर : दूधगंगेचे हक्काचे पाणी देणार नाही

Arun Patil

सुळकूड/कसबा सांगाव, पुढारी वृत्तसेवा : दूधगंगा प्रकल्पातील हक्काचे पाणी देणार नाही, प्रसंगी उपोषणासह सर्व प्रकारच्या आंदोलनाची तयारी ठेवू; पण मागे हटणार नाही. या आक्रमक भूमिकेतून सुळकूड येथील पाणी परिषदेत सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, शेतकर्‍यांनी आपल्या भावना तीव्र शब्दांत व्यक्त केल्या.

इचलकरंजीसाठी येथील लोकभावनेचा अनादर करत पाणी योजना रेटणार्‍या प्रशासनाचा जाहीर निषेध करत आमच्या हक्काच्या पाण्याचा हिशेब मागणारे आपण कोण? आम्ही आमच्या जमिनी दिल्या, आमच्यावर अन्याय करत पाणी उचलून हा भाग बकाल झाला, तर पुढील पिढी आम्हास माफ करणार नाही. सध्या कोल्हापूर या नियोजित योजनेतून पाणी उपसा चालू नसला, तरी दत्तवाड येथे नदी संपूर्ण कोरडी पडली आहे हे वास्तव आहे, अशा परखड भावना पाणी परिषदेत व्यक्त झाल्या.

समरजित घाटगे म्हणाले, आमच्या हक्काच्या पाण्यावर गदा न आणता तुम्ही पंचगंगेचे पाणी शुद्धीकरण करून वापरा. अंबरिश घाटगे म्हणाले, रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोवर पाणी उचलू देणार नाही. राजकीय उदासीनतेतून पैसे खाण्यासाठी ही योजना आखली आहे. बाबासाहेब हिंदुराव पाटील म्हणाले, कोण पाहिजे ते आमच्या पाण्यावर डल्ला मारत आहेत. कोणालाही प्रकल्पाच्या नियोजित आराखड्याची कल्पना नाही. योजनेचा कोणताही माणूस आला, तर चावडीत डांबून घालू. राजेखान जमादार म्हणाले, आमच्या उरावर कशाला येता. रक्ताचे पाट वाहतील; पण पाणी जाऊ देणार नाही.

यावेळी भवानीसिंह घोरपडे, सरपंच सौ. वीरश्री जाधव (कसबा सांगाव), सरपंच चंद्रकांत कांबळे (दत्तवाड), ए. डी. चौगुले, बापूसाहेब पाटील, काकासो वाणी, धनराज घाटगे, रमेश माळी, दिलीप देशपांडे, बाबासो नदाफ (हेरवाडे), अविनाश मगदूम, सागर कोंडेकर, अनिल कुरणे (हंचनाळ) यांची भाषणे झाली. कृती समितीच्या वतीने सहा ठराव मंजूर करून उपस्थितांची शपथ घेण्यात आली.

सरपंच सुप्रिया भोसले, उपसरपंच शरद धुळूगडे (सुळकूड), सरपंच छाया कुंभार, उपसरपंच सौ. सीमा तोडकर (लिंगनूर), सरपंच राहुल खोत, उपसरपंच सुधाकर खोत (रणदिवेवाडी), उपसरपंच प्रवीण माळी, माजी सरपंच युवराज पाटील, विक्रमसिंह जाधव आदींसह परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजकारणी दुटप्पी

सागर कोंडेकर म्हणाले, इचलकरंजीसाठी सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन योजना रेटण्याचे काम करीत आहेत. त्यांचे कौतुक… तर राजकीय विद्यापीठ असणारे कागलचे सर्व नेते दुटप्पी राजकारण करत आहेत. त्यांनी मनावर घेतले तर योजना रद्द केल्याचे पत्र ते घेऊन येऊ शकतात. त्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे.

रखरखत्या उन्हात…

सुळकूडच्या जुन्या बंधार्‍यावर पाणी परिषदेसाठी घालण्यात आलेला मंडप अपुरा पडल्याने शेतकरी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी रखरखत्या उन्हात उभे होते. सीमाभागातील अनिल कुरणे (हंचनाळ) हे आजारी असतानासुद्धा परिषदेत उपस्थित राहून त्यांनी आपला विरोध दर्शवला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT