कोल्हापूर

कोल्हापूर : दसर्‍यामुळे वाहन उद्योगाची चक्रे गतिमान

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दसर्‍यानिमित्त अर्थसहाय्य, सुलभ हप्ते, अत्यंत कमी डाऊनपेमेंट आणि विक्रीपश्चात मिळणार्‍या सेवेमुळे येणार्‍या सणात वाहन खरेदी-विक्री उद्योगास चांगलाच पिकअप मिळणार आहे. त्यामुळे दसरा-दिवाळीच्या मुहूर्ताने वाहन खरेदीसाठी शहरातील अनेक शोरूममध्ये अगाऊ बुकिंगसाठी ग्राहक कुटुंबासह गर्दी करू लागला आहे. दसरा-दिवाळी सणानिमित्त अनेक शोरुम्स विद्युत रोषणाईने झगमगत असून बुकिंगसाठी येणार्‍या ग्राहकांचे अगत्याने स्वागत केले जात आहे. यानिमित्ताने हजारो कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे वाहन उद्योगात अपेक्षित उलाढाल झाली नाही. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव, दसरा व दिवाळी सणाकडे वाहन उद्योगाचे लक्ष लागून आहे. अनेक कंपन्यांनी दसरा-दिवाळीचे औचित्य साधून नवीन आकर्षक मॉडेलचे लाँचिंगही केले आहे. देशात कोणतेही नवीन वाहन तयार झाले की, त्याचे पहिले बुकिंग हे कोल्हापुरात होतेच. त्यामुळे कोल्हापुरात ज्या वाहनांना सर्वाधिक मागणी, त्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे अनेक आलिशान वाहने कोल्हापूरच्या रस्त्यावरून धावताना दिसतात. चारचाकी अन् मोटारसायकलच्या नवीन मॉडेल दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाँचिंग केले जाते. त्यामुळे कोल्हापूरवासीय ग्राहक नवीन मॉडेलचे वाहन खरेदी करण्यासाठी हमखास पसंती देतात. विशेषत: युवकांमध्ये स्पोर्टस् बाईकची क्रेझ असताना युवती व महिला मोपेडला अधिक पसंती देत आहेत.

हॅचबॅक, एसयूव्ही वाहने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. या वाहनांमध्ये मिळणार्‍या सुविधा पाहता मध्यमवर्गीयांचा कलही ही वाहने खरेदीकडे आहे. याबरोबरच इलेक्ट्रिक वाहनांनाही मागणी वाढली आहे.चारचाकी तसेच दुचाकी वाहने, अनेक रेंजच्या बाईक व कार ग्राहकांचे आकर्षण ठरत आहेत. गणेशोत्सवात या वाहनांची चांगली विक्री झाली आहे. तरुणाईमध्ये ई-बाईकची क्रेझ वाढली आहे. पेट्रोल, डिझेल वाहनांच्या तुलनेत ई-बाईकच्या किमती जास्त आहेत. पण पेट्रोलच्या वाढत्या दराला पर्याय म्हणून ई-बाईक पुढे येऊ लागल्या आहेत.

ई-बाईक, स्कूटरची मागणी वाढली

पूर्वी ई-बाईकला फारशी मागणी नसायची. पण आता रोज 22 ते 25 बुकिंग होत आहे.टीव्हीएस कंपन्यांच्या ई-बाईकला तीन महिने वेटिंग आहे. दसरा व दिवाळीनिमित्त अनेक ग्राहकांनी अगोदरच बुकिंग केले होते. पण नव्याने ई-बाईकचे बुकिंगचे प्रमाण वाढल्याचे माय टीव्हीएसचे अनिल कांबळे यांनी सांगितले.

चारचाकी वाहन बुकिंगला प्रतिसाद

नवरात्रात दसरा मार्केट चांगलेच बहरले असून दसर्‍यानिमित्त वाहनांचे बुकिंग जोरदार आहे; तर काही ठरावीक वाहनांना वेटिंग आहे. काही ग्राहक दसर्‍याबरोबरच दिवाळीसाठी वेगळे बुकिंग करत आहेत. त्यामुळे यंदा दसरा व दिवाळीला वाहन उद्योगाची चक्रे गतिमान होणार आहेत, असे साई सर्व्हिसचे सीईओ सुधर्म वाझे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT