कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दसरा मैदानात शोभणारा छत्रपतींचा भव्य भगवा ध्वज, लकडकोटावरील शमीपूजन, शिस्तबद्ध पोलिस बँडवर सुरू असणारी करवीर राज्य गीताची धून, अंबाबाई, तुळजाभवानी व गुरुमहाराजांच्या पालख्या, पारंपरिक वेशभूषेतील सरदार-मानकरी अशा मंगलमय आणि शिस्तबद्ध वातावरणात बुधवारी सायंकाळी कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा उत्साहात साजरा झाला.
सायंकाळी 6 वाजून 16 मिनिटांनी शाहू महाराज यांच्या हस्ते लकडकोटावरील 'शमीपूजन' झाले. यानंतर संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजराजे व यशस्विनीराजे यांनी देवींची आरती करताच हजारोंच्या संख्येने उपस्थितांनी सीमोल्लंघन करून सोने लुटले.
सोहळ्यास दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. जयश्री जाधव, आ. प्रा. जयंत आसगावकर, आ. प्रकाश आवाडे, विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी. टी. शिर्के, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती संजय डी. पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजयसिंह चव्हाण, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, उद्योजक व्ही. बी. पाटील, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे आर. के. पोवार, भाजपचे राहुल चिकोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, अॅड. गुलाबराव घोरपडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दसरा सोहळ्यास परंपरेप्रमाणे रणजीतसिंह चव्हाण (हिंम्मत बहाद्दर), निलराजे बावडेकर (पंत अमात्य), पद्मुम्नराजे खर्डेकर, रामचंद्र पाटणकर, बि—गेडीयर थोरात, सेनापती घोरपडे, घोरपडे (अमीर उल उमराव), माने (भीम बहाद्दर), भोपराव कदम, विक्रमसिंह यादव, गायकवाड, यादव, इंगळे आदी घराण्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सोहळ्याचे संयोजन छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टने केले.
पालख्यांपाठोपाठ हुजूर स्वार्यांचे आगमन
मुख्य सोहळ्यापूर्वी करवीरनिवासिनी अंबाबाई, जुना राजवाडा येथील तुळजाभवानी आणि गुरुमहाराज यांच्या पालख्यांचे लवाजम्यासह भाऊसिंगजी रोडवरून दसरा चौकात आगमन झाले. यानंतर नवीन राजवाडा येथून हुजूर स्वार्या (छत्रपती घराण्यातील सदस्य) यांचे ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात सायंकाळी 6 वाजता आगमन झाले.
यावेळी पोलीस विभाग व टी. ए. बटालियनच्या बँड पथकाने करवीर संस्थानच्या गीताची धून वाजवून स्वागत केले. मानकर्यांनी बंदुकीच्या फैरी झाडल्या. दसरा महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती कुटुंबातील सदस्यांचे स्वागत प्रथेप्रमाणे औक्षण करून करण्यात आले. राजर्षी शाहू वैदिक स्कूलच्या पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधिवत लकडकोटावरील शमीचे पूजन व देवीची आरती करण्यात आली. इतिहास अभ्यासक अॅड. प्रसन्न मालेकर यांनी दसरा सोहळ्याची परंपरा व इत्यंभूत माहिती आपल्या सूत्रसंचालनात सांगितली.
संस्थान शिवसागर, सिद्धार्थनगर भेट
दसरा चौकातील मुख्य सोहळ्यानंतर छत्रपतींच्या हुजूर स्वार्यांची मेबॅक कार आणि करवीरनिवासिनी अंबाबाई, तुळजाभवानी व गुरुमहाराज यांच्या पालख्या मानकर्यांसह राजर्षी शाहूकालीन प्रथेप्रमाणे सिद्धार्थनगर व पंचगंगा नदी घाटावरील 'संस्थान शिवसागर' येथे नेण्यात आल्या. यानंतर जुना राजवाडा व नवा राजवाडा येथे लोकांनी सोने देण्यासाठी गर्दी केली होती.
कोल्हापूरच्या कला, क्रीडा, संस्कृतीची विविधता
दसरा सोहळ्यात शासकीय सहभागामुळे लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. अंबाबाई व तुळजाभवानी पालखीच्या जुना राजवाडा ते दसरा चौक आणि हुजूर स्वार्यांच्या नवा राजवाडा ते दसरा चौक मार्गावर कोल्हापूरच्या कला, क्रीडा, संस्कृतीची विविधता एकवटली होती. शिवकालीन युद्धकला, कुस्ती, मल्लखांब, शिवशाहिरांचे पोवाडे, कोल्हापुरी फेटा बांधलेला खेळाडू, कलाकारांनी साकारलेला कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची विविधता सांगणार्या कलाकृतींचा चित्ररथ लोकांचे आकर्षण ठरले. मिरवणूक मार्गावर एनसीसीच्या कॅडेटनी पुष्पवृष्टी केली.