कोल्हापूर

कोल्हापूर : दरोडेखोरांची टोळी जेरबंद; जवाहरनगरात अर्धा तास थरार

दिनेश चोरगे

कोल्हापूर;पुढारी वृत्तसेवा :  चोरी करण्यासाठी जवाहरनगर येथील मंजूर मिरजकर यांच्या घरी मंगळवारी मध्यरात्री शिरलेल्या टोळीचा मिरजकर कुटुंबीयांनी जोरदार प्रतिकार केला. चोरट्यांनी केलेल्या दगडफेकीत फिरोज मिरजकर व त्यांची कन्या सोफिया जखमी झाले. त्यांचा आरडाओरडा ऐकून जवाहरनगरातील अन्य रहिवासी जागे झाले. दगडफेक करत पळ काढलेल्या टोळीला राजारामपुरी पोलिसांनी जेरबंद केले. संशयित टोळी ही मध्य प्रदेशातील असून, त्यांच्याकडून चोरीचे साहित्य जप्त केले आहे.

मुकेश अमरसिंग मसाण्या (वय 25, रा. जोबट, उदयगड), राहुल हानसिंग बामण्या (28), राकेश कालू बघेल (28), पानसिंग कालू बघेल (27, तिघे रा. काटी, कुकशी, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून कटावणी, बॅटरी, पाना, स्क्रू ड्रायव्हर असे साहित्य जप्त केले.

फिरोज मिरजकर हे जवाहरनगरातील लक्ष्मी कॉलनीत राहतात. शेजारी त्यांच्या चुलत्याचे घर आहे. तिथे कोणीही राहत नाही.
त्यांचा मुलगा मंजूर मिरजकर हा पुण्यात राहत असल्याने घराला कुलूप होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास मंजूर मिरजकर यांच्या खोलीत तिजोरी तोडतानाचा आवाज आल्याने शेजारील मिरजकर बंधू जागे झाले. आरडाओरडा होताच चोरटे बाहेर फिरोज हे घराबाहेर आले असता कम्पाऊंडबाहेर थांबलेल्या एका चोरट्याने त्यांच्या दिशेने दगड भिरकावला. तो फिरोज यांच्या पोटावर लागला. फिरोज यांनी 'चोर, चोर' असा आरडाओरडा सुरू करताच अन्य चोरटेही बाहेर आले. त्यांनी दगड भिरकावण्यास सुरुवात केली.

रहिवाशांच्या दिशेनेही दगडफेक

त्यावेळी फिरोज यांची मुलगी सोफिया घराबाहेर आली असता तिच्या डोक्यालाही दगड लागला. या गदारोळामुळेे परिसरातील रहिवासी बाहेर आले असता चोरट्यांनी त्यांच्या दिशेने दगडफेक करत पळ काढला.

तिजोरी, कपाटांची मोडतोड

चोरट्यांनी मिरजकर यांच्या घरातील तिजोरीचे दरवाजे अक्षरशः वाकवले. तसेच भिंतीतील कपाटांचीही मोडतोड केली. संपूर्ण घरात कपडे, प्रापंचिक साहित्य व काचांचा खच पडला होता. मात्र, चोरट्यांच्या हाताला फारसा ऐवज लागला नाही.

पोलिसांनी नाकाबंदी करून चोरट्यांना केले जेरबंद

मध्यरात्री चोरट्यांनी केलेल्या दगडफेकीचा थरार जवाहरनगरातील रहिवाशांनी अनुभवला. यानंतर चोरटे पसार झाले. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी तत्काळ नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन राबवत संशयित चोरट्यांची टोळी टाकाळ्याजवळ जेरबंद केली. त्यांच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT