कोल्हापूर

कोल्हापूर : थंडी, तापाने रुग्ण बेजार

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील वातावरणात होणार्‍या बदलामुळे घरोघरी थंडी, ताप, सर्दी आणि खोकल्याची लक्षणे असणारे रुग्ण आढळून येऊ लागले आहे. थंडी, तापाने रुग्ण बेजार झाले असून, दवाखान्यांत रुग्णांची तोबा गर्दी होत आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत डॉक्टरांची ओपीडी सुरू असते. डेंग्यू, कोरोना अहवाल निगेटिव्ह तरी देखील ताप, सर्दी, खोकला का? असा प्रश्न रुग्ण, नातेवाईकांकडून डॉक्टरांकडे उपस्थित केला जात आहे.

'व्हायरल फीव्हर'चा ताप अनेक रुग्णांना असल्याचे डॉक्टरांनी सांगितले; पण रुग्णांनी कोरोना, स्वाईन फ्लू, डेंग्यूपासून सावधान राहणे गरजेचे आहे. औषधांच्या दुकानांत ताप, सर्दी, खोकल्याची औषधे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात महापूर आला होता. चार दिवसांनंतर पुराचे पाणी ओसरले. पुन्हा ऊन, पाऊस तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस असा खेळ सुरू झाला. या बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

सीपीआरमधील बाह्यरुग्ण विभागातील नोंदणी 700 वरून 1150 वर गेली आहे. तसेच खासगी दवाखान्यांतील नोंदणी 40 वरून 90 च्या पुढे गेली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयांतही रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

…अशी आहेत व्हायरल तापाची लक्षणे

व्हायरल तापाची काही विशिष्ट लक्षणे शरीरात दिसून येतात. यात घसा दुखणे, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, सांधेदुखी, उलट्या आणि अतिसार सुरू होतो. याशिवाय डोळे लाल होऊन डोके गरम होण्यास सुरुवात होते. अशा वेळी घरगुती उपाय अथवा अंगावर न काढता दवाखान्यात जावे.

जिल्ह्यात कोरोना, स्वाईन फ्लू, डेंग्यूचे रुग्ण आहेत. वातावरणात बदल होऊन काही अनेक ठिकाणी सर्दी, ताप, खोकला या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. रुग्णांनी घाबरून न जाता वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्याने औषधे घ्यावीत.
डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT