कोल्हापूर

कोल्हापूर : ढिसाळ नियोजनाने उपनगरांत पाणीटंचाई

दिनेश चोरगे

कोल्हापूर; डॅनियल काळे :  महापालिका पाणीपुरवठ्यावर दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा खर्च करते. नदीलाही बारमाही पाणी असते. तरीदेखील बहुतांशी उपनगरांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. अमृत योजना आणि गॅस पाईपलाईनच्या खोदाईमुळे अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्या आहेत. यातून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. कोल्हापूर शहराला शिंगणापूर योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. बालिंगा आणि शिंगणापूर येथून दररोज 140 एमएलडी पाण्याचा उपसा जातो. शहरात अनेक ठिकाणी उंच टाक्या बांधल्या आहेत. त्या भरल्या जात नाहीत. टाक्या भरण्यासाठी वेळ लागतो म्हणून कर्मचारी बायपासद्वारे पाणी सोडतात. त्यामुळे उंच भागात पाणीपुरवठा होत नाही.

ई वॉर्डाला सर्वाधिक झळा

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या योजनांचे उपसा केंद्र शहराच्या पश्चिम बाजूला एका टोकाला आहे. तर ई वॉर्डातील भाग शहराच्या पूर्वेला दुसर्‍या टोकाला आहे. ई वॉर्डाच्या वाट्याला पाणी येईपर्यंत पाणी संपते. परिणामी ई वॉर्डातील मार्केट यार्ड, जाधववाडी, कदमवाडी, रुईकर कॉलनी, पाटोळेवाडी, कपूर वसाहत, सदर बाजार, विचारेमाळ, शिवाजी पार्क येथे पाण्याची टंचाई जाणवते. कावळा नाका, मार्केट यार्ड, शाहूपुरी पाच बंगला परिसरातील पाण्याच्या टाक्याच भरल्या जात नाहीत. त्यामुळे येथे पाण्याचा तुटवडा जाणवतो. राजारामपुरीसारख्या भागातही कमी दाबाने पाण्याचा पुरवठा केला जातो. शहराच्या पूर्वेकडील महत्त्वाची सगळी उपनगरे तहानलेली आहेत.

टाक्या न भरता बायपासवर भर

पाणीपुरवठा विभागात ढिसाळ नियोजन आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी सोडल्यानंतर पहिल्यांदा पाण्याच्या टाक्या भरणे आवश्यक आहे. टाक्या भरल्यानंतर त्या त्या टाकीवर अवलंबून असणार्‍या भागात पाणी सोडले तर पूर्ण दाबाने मुबलक पाणीपुरवठा होतो. परंतु तसे न करता बायपासद्वारे पाणी सोडल्यामुळे अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. कावळा नाका टाकी 22 वर्षांहून अधिक काळ भरलेलीच नाही. मार्केट यार्ड टाकी बांधून झाल्यापासून टाकीत पाणी सोडून पाणीपुरवठा केला जात नाही. शाहूपुरी पाच बंगल्याजवळील टाकीतही पाण्याचा टिपूस पडलेला नाही. या टाक्या बांधण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च झालाय. पण टाक्या भरत नसल्याने ही
'पालथ्या घड्यावर पाणी' अशीच स्थिती झाली आहे.

रिंगरोडसह पूर्वेकडील उपनगरातही टंचाई

अलीकडच्या काळात फुलेवाडी रिंगरोडच्या सर्व बाजूने मोठ्या वसाहती होत आहेत. घरांची संख्या वाढत आहे. पण त्या तुलनेत पाणी वाटपाचे नियोजन केले जात नाही. त्यामुळे या पूर्व बाजूच्या उपनगरांनाही पाणी मिळत नाही. उंच भागात कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT