कोल्हापूर

कोल्हापूर : डोळे बांधून ३२ किलोमीटर स्केटिंग

सोनाली जाधव

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
काही क्षणांसाठीही डोळे बंद केल्यावर आंधळेपणाने काहीही करणे केवळ अशक्य होते. मात्र इशिका चेतन डावरे या अवघ्या सातवर्षीय मुलीने डोळ्यावर काळी पट्टी बांधून स्केटिंग करत तब्बल 32 कि.मी. अंतर केवळ 3 तास 10 मिनिटांत पूर्ण करण्याचा नवा विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला आहे. इशिकाच्या या कामगिरीची नोंद 'नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये झाली आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण केंद्राची खेळाडू इशिकाने राजर्षी शाहू मार्केट यार्ड मधील गेट क्रमांक एकसमोरील विठ्ठल मंदिरासमोर हा विक्रम केला. रविवारी सकाळी 6 वाजता दत्ताजीराव वारके यांच्या हस्ते विक्रमास प्रारंभ झाला. इशिकाने डोळ्यावर पट्टी बांधून 21 कि. मी. स्केटिंग करण्याचा निर्धार करून त्यासाठीची तयारी केली होती. इशिकाने 21 कि. मी. अंतर अवघ्या 2 तासांतच पूर्ण केले. इतक्याने न थकता इशिकाने जिद्दीने आणखी काही कि. मी. स्केटिंग करण्याचा निर्धार व्यक्‍त केला. 9 वाजण्याच्या सुमारास उन्हाच्या चटक्यांचा त्रास जाणवू लागल्याने 9 वाजून 10 मिनिटांनी इशिकाने स्केटिंग करणे थांबविले. तोपर्यंतच्या 3 तास 10 मिनिटांत तिने तब्बल 32 कि. मी. स्केटिंग केले होते. इशिकाने विक्रम पूर्ण करताच तिच्या कुटुंबीयांनी तिला प्रोत्साहन-पाठबळ देण्यासाठी उपस्थित क्रीडाप्रेमींनी फटाक्?यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

विक्रमवीर इशिकाचा गौरव अ‍ॅड. धनंजय पठाडे, दत्तात्रय वारके, डॉ. संदीप पाटील, स्वातंत्र्य सेनानी शांताबाई कदम, उत्तम फराकटे यांच्या हस्ते झाला. तिला 'नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड' ची ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन, कोल्हापुरी फेटा बांधून गौरविण्यात आले. यावेळी इशिकाची आई अ‍ॅड. आरती डावरे, वडील चेतन डावरे, मामा आकाश बेडकाळे आदी उपस्थित होते. इशिकाला प्रशिक्षिका तेजस्विनी कदम व धनश्री कदम यांचे मार्गदर्शन लाभले. संयोजन विक्रम खाडे, किशोर गायकवाड, प्रकाश पुरेकर, अशोक निंबाळकर, निवास रोकडे, भास्कर कदम आदींनी केले.

महाराष्ट्रातील पहिला विक्रम

नॅशनल बुकचे प्रतिनिधी महेश कदम यांनी अशा प्रकारचा महाराष्ट्रातील पहिलाच विक्रम झाल्याचे जाहीर केले. तसेच सदर विक्रमाची नोंद 'नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये झाली असून, 'लिम्का बुक' व 'गिनीज बुक'मध्ये याची नोंद व्हावी यासाठी तो पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याही हस्ते इशिकाचा विशेष सत्कार झाला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची प्रमुख उपस्थिती होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT