कोल्हापूर; प्रवीण मस्के : शिक्षक भरतीसाठी आवश्यक राज्य शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) एक वर्ष होत आले तरी अद्याप निकाल परीक्षा परिषदेने जाहीर केलेला नाही. टीईटी घोटाळ्यामुळे निकाल लांबणीवर पडला असला तरी मागील वर्षी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार की परीक्षाच रद्द होणार? असा प्रश्न परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पडला आहे. परीक्षेचा निकाल नाही, शिक्षक भरती नाही, यामुळे भावी शिक्षक अडचणीत सापडले आहेत.
शिक्षक पदाच्या भरतीसाठी 2013 पासून 'टीईटी' परीक्षा बंधनकारक करण्यात आली. कोव्हिड संसर्गामुळे 2020 रोजी 'टीईटी' परीक्षा झाली नाही. टीईटी परीक्षा 30 ऑक्टोबर 2021 रोजी होणार होती. परंतु, काही कारणास्तव रद्द करून 'टीईटी' परीक्षा 21 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातून पेपर क्र.1 साठी 7 हजार 385 तर पेपर क्र.2 साठी 7 हजार 806 उमदेवार परीक्षेला बसले. एस.टी. संपाचा फटका परीक्षार्थींना बसला. हजारो विद्यार्थ्यांना उशिरा आल्याने प्रवेश नाकारण्यात आला.
परीक्षा निकाल जाहीर करण्याआधीच राज्यातील 'टीईटी' परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला. 7 हजार 784 गैरप्रकार केलेल्या परीक्षार्थींची काळी यादी जाहीर करण्यात आली. त्यासंदर्भात पोलिस कारवाईदेखील सुरू आहे. मात्र, 'टीईटी' परीक्षा होऊन एक वर्ष होत आले तरी अद्याप परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. गेल्या काही वर्षांत चार शिक्षणमंत्री झाले. मात्र, यातील एकाही शिक्षणमंत्र्यांनी शिक्षक भरतीचा प्रश्न पूर्णपणे सोडवलेला नाही. काहींची वयोमर्यादा संपली असून काही जणांची संपत चालली आहे. त्यामुळे या उमेदवारांनी करायचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीचे शिक्षण विभागाकडून सहा महिन्यांपूर्वी नियोजन करण्यात आले होते. परंतु, अद्याप राज्य परीक्षा परिषदेने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले नसून अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे उमेदवार नैराश्याच्या गर्तेत अडकत चालले आहेत. दुसरीकडे 2012 पासून शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे डी.एड., बी.एड. उमेदवार बेरोजगार झाले आहेत.
शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीचा खेळखंडोबा सुरू आहे. 2017 सरकारे बदलली तरी शिक्षक भरतीचा प्रश्न 'जैसे थे' आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांना पात्र उमेदवारांच्या भविष्याचे काही पडलेले नाही. जर शिक्षण मंत्र्यांना शिक्षण खात्याचा कारभार जमत नसेल तर पात्र डी.एड., बी.एड. धारकास काही कालावधीसाठी शिक्षणमंत्री करावे. पूर्ण शिक्षक भरती तत्काळ न केल्यास विद्यार्थी, युवक संघटना याच्या विरोधात जनआंदोलन छेडतील.
– जावेद तांबोळी, राज्य सेक्रेटरी, ऑल इंडिया यूथ फेडरेशन