कोल्हापूर : अनिल देशमुख : जिल्हाधिकारी कार्यालयातील टपाल, फाईल्सवर आता ऑनलाईन लक्ष राहणार आहे. याकरिता ट्रॅकिंगची संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्याची चाचणी सुरू असून, लवकरच ती सर्व विभागांत कार्यान्वित केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय विभागांची पत्रे, अहवाल याच्यासह नागरिक, कर्मचार्यांचे विविध प्रकारचे अर्ज दाखल होत असतात. त्याची दैनंदिन संख्या हजारांवर असते. कार्यालयाच्या आवक-जावक विभागात दाखल झालेली ही कागदपत्रे म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाचे टपाल असते. या टपालाला शासकीय कार्यालयात मोठे महत्त्व आहे.
दाखल झालेले टपाल संबंधित अधिकारी, कर्मचार्यांपर्यंत पोहोचणे आणि त्यावर पुढील कार्यवाही होणे यामध्ये अनेकदा विलंब होतो. अनेक वेळा टपाल मिळाले की नाही, याचाच पत्ता लागत नाही. परिणामी अनेक कामांचा वेग कमी होतो. अनेकवेळा कर्मचारीही विविध कारणांनी टाळाटाळ करतात, पत्र अथवा अर्जच सापडत नसल्याने नागरिक हतबल होतात. यामुळे अनेक कामे रखडतात. आता मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात अशा प्रकाराला आळा बसेल अशीच चिन्हे आहेत. जिल्हाधिकार्यांनी टपाल आणि फाईल्स ट्रॅकिंग सिस्टिम सुरू केली आहे.
काय होणार?
जिल्हाधिकारी कार्यालयात आलेला प्रत्येक अर्ज, पत्र, अहवाल (आवक विभागात दाखल झालेला कागद) याची संगणकीय प्रणालीवर नोंद होईल.
यानंतर ते पत्र कोणाकडे गेेले, केव्हा गेले, किती दिवस त्याच्याकडेच प्रलंबित आहे आदी सर्व तपशील एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
तसेच कोणाकडे कोणता अर्ज आहे, हे अधिकारी, कर्मचार्यांनाही पाहता येणार आहे. यामुळे पत्र सापडत नाही, अजून मिळालेले नाही, अशी कारणे यापुढे नागरिकांना ऐकायला मिळणार नाहीत.
या प्रकारामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्याही कमी होईल. असाच प्रकार फाईल्सबाबतही होणार आहे. प्रत्येक प्रकरणाच्या फाईल्सची सद्यःस्थिती एका क्लिकवर कळणार आहे.
या संगणक प्रणालीची चाचणी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये काही अडचणी येतात का, येत असतील तर त्या दूर करून ही प्रणाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांत लागू केली जाईल. यामुळे कामकाजावर ऑनलाईन लक्ष राहील, परिणामी सर्व विभागांतील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होईल. नागरिकांची कामे वेळेेत पूर्ण होण्यास मदत होईल.
राहुल रेखावार, जिल्हाधिकारी