कोल्हापूर

कोल्हापूर : झेडपीसाठी शिवसेनेची कसरत

Arun Patil

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शिवसेनाही दुभंगली आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन आमदार व दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवार मिळविण्यासाठी शिवसेनेला कसरत करावी लागणार आहे.

ग्रामीण भागातील कार्यकर्ते तयार करणारी कार्यशाळा म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. आजपर्यंत जिल्हा परिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. 2019 मध्ये राज्यात सत्तांतर झाले. महायुतीची सत्ता जाऊन काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार आले. अडीच वर्षांनंतर पदाधिकारी बदलावेळी पुन्हा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली.

काँग्रेसने राष्ट्रवादी, शिवसेना व छोट्या आघाड्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता अडीच वर्षांत संपुष्टात आणली. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना काँग्रेससोबत शिवसेनेचे माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आबिटकर, माजी आ. चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील, संजय घाटगे ही सर्व मंडळी होती. गेल्या सभागृहात शिवसेनेचे 10 सदस्य होते.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातही शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यामध्ये जिल्ह्यातील विद्यमान सर्व खासदार, आमदार शिंदे गटात गेले आहेत. माजी आमदारांपैकी सत्यजित पाटील वगळता बहुतांशी माजी आमदार सर्व घटनांकडे शांतपणे पाहत आहेत. त्यांनी थेट भूमिका घेतलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेला उमेदवार शोधण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.

फुटीमुळे नवीन चेहर्‍यांना मिळणार संधी

ग्रामीण भागातील पदाधिकारी नेत्यांसोबत गेले नसल्याचे सांगण्यात येत असले तरी जिल्हा परिषदेच्या गेल्या सभागृहात शिवसेनेचे जे सदस्य होते, त्यातील बहुतांशी सदस्यांचे नेते शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत नवीन चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT