कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात ३५,००० हेक्टरचे पंचनामे प्रलंबित

Arun Patil

कोल्हापूर; संतोष पाटील : यंदाच्या महापुरात जिरायती, बागायती आणि फळपिकांचे अंदाजित 71,257 हेक्टरवर नुकसान झाल्याचा शासकीय अंदाज आहे. त्यातील 53 हजार हेक्टरवरील पूरबाधित पिकांचा पंचनामा पूर्ण झाला आहे. अद्याप नुकसानग्रस्त सुमारे 35 हजार हेक्टरपर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचलेली नाही. पंचनामा पूर्ण होऊन नुकसानीचा अंदाज आल्याशिवाय राज्य शासन मदत जाहीर करणार नसल्याने यंत्रणा गतिमान करण्याची गरज आहे. महापुरात शेतातच उभे पीक कुजल्याने बळीराजा हतबल झाला असून, शासन मदतीकडे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने 1,165 गावांतील पिके बाधित झाली आहेत. यामध्ये जिरायत क्षेत्र 15,673 हेक्टर, बागायती क्षेत्र 55,570 हेक्टर, तर फळपिके आणि भाजीपाल्याचे दीड हजार हेक्टर क्षेत्र असल्याचा शासनाचा प्राथमिक अंदाज आहे. यातील जिरायती 9,256 हेक्टर, बागायती 3,766 हेक्टर, तर फळ आणि भाजीपाल्याचे नुकसानीच्या अंदाजापेक्षा 20 हेक्टर क्षेत्र वाढून 29 हेक्टर पिकांचा पंचनामा पूर्ण झाला आहे.

अजूनही जिल्ह्यातील सुमारे 35 हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण होण्यास किमान 15 दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यानंतर शासनाला नुकसानीचा अहवाल सादर झाल्यानंतर राज्यातील इतर पूरबाधित जिल्ह्यांसह कोल्हापूरसाठी नुकसानभरपाई जाहीर होईल. 100 टक्के खराब झालेले पीक शेतातून काढावे लागणार आहे. पंचनामा झाल्यानंतरच नुकसान मिळणार आहे. नुकसानभरपाई मिळणार की नाही, हे स्पष्ट झाल्याशिवाय कुजलेले पीक शेतातून काढणे बळीराजाचे आर्थिक नुकसान करणारे ठरू शकते. त्यामुळे बळीराजा अक्षरश: हतबल झाला आहे.

दरम्यान, सध्याच्या निकषानुसार जिल्ह्यातील पिकांचे नुकसान 90 कोटी रुपयांच्या वर जाणार नाही. मागील 2019 प्रमाणे राज्य शासनाला नुकसानभरपाई तिप्पट किंवा चौपट करावी लागणार आहे. तरच बळीराजाला किमान आर्थिक दिलासा मिळणार आहे.

किचकट प्रक्रिया

पंचनामा प्रक्रिया अधिक सुलभ करण्याची गरज व्यक्‍त केली जात आहे. अनेक चावडी कार्यालयांनी दोन-चार दिवसांचा अवधी देत शेतकर्‍याला बाधित पिकांचे फोटो, बँक खात्याची माहिती देण्यास सांगितले आहे. ही माहिती सादर करताना शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 2019 च्या महापुरातील बाधित क्षेत्राची माहिती महसूल विभागाकडे आहे. याची पडताळणी करत यंत्रणेने बांधावर जाऊन प्रत्यक्ष माहिती घेऊन पंचनामा पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

पूरबाधित एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या उसाचा शेंडा बुडाला आहे तो ऊस 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीत धरला आहे.
– ज्ञानदेव वाकुरे, कृषी अधीक्षक, कोल्हापूर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT