कोल्हापूर

कोल्हापूर : जिल्ह्यात आरोग्य विभागात 518 पदे भरणार

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  शासनाने आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया नव्याने राबविण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू केले आहे. जिल्ह्यात 518 पदे भरण्यात येणार आहेत. ज्यांनी यापूर्वी अर्ज केले होते आणि आता त्यांनी वयोमर्यादा ओलांडली असेल तर अशा तरुणांना वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे; परंतु अर्जामध्ये यापूर्वी भरलेल्या माहिती उल्लेख करणे आवश्यक आहे.

शासनाच्या वतीने आरोग्य विभागातील आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी यांची पदे भरण्याचा निर्णय मार्च 2018 मध्ये घेतला होता; परंतु कोरोना, आरक्षण यामुळे ही भरती लांबत गेली. या भरतीसाठी सुमारे 13 लाख तरुणांनी अर्ज केले होते. ही भरती प्रक्रिया रद्द करून राज्यात 10 हजार 127 पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती अद्ययावत करण्याच्या सूचना जिल्हा परिषद आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने रोस्टर निश्चित करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच ते अंतिम मान्यतेसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात आरोग्य सेविकांची 299, आरोग्य सेवक 198 व औषध निर्माण अधिकार्‍यांची 21 पदे भरण्यात येणार आहेत. मार्च 2018 मध्ये ज्यांनी अर्ज केले असतील आणि त्यांनी वयोमर्यादा ओलांडली असेल तर अशा तरुणांना या भरतीसाठी अर्ज करण्यास परवानगी दिली आहे.

SCROLL FOR NEXT