कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागात वळवाचा तडाखा : सहा जखमी

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या अनेक भागाला शुक्रवारी जोरदार वार्‍यासह वळवाने तडाखा दिला. शहर आणि परिसरात मात्र वातावरण होऊनही पावसाने हुलकावणी दिली. कागल येथे एका वीटभट्टीवर वीज कोसळून सहाजण जखमी झाले. टोप परिसरात ढगफुटीसद़ृश पाऊस झाला. जिल्ह्यात पावसाने पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. ऊस पिकालाही पावसाचा दिलासा मिळाला आहे. मात्र, अनेक ठिकाणी वीटभट्टी, आंबा, काजू उत्पादकांचे नुकसान झाले आहे. शनिवारपासून दि. 14 मेपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

कागल येथील नवोदय विद्यालयाशेजारी सतीश गंगाराम कुंभार (रा. शाहूनगर) यांची वीटभट्टी आहे. या वीटभट्टीवर दुपारी चार वाजून 16 मिनिटांनी वीज कोसळली. यामध्ये सतीश गंगाराम कुंभार, छाया गंगाराम कुंभार, साधना सतीश कुंभार, नागेश अशोक कासोटे, उमेश विजय घाऊट, दीपक सदाशिव शिरोळे असे सहाजण जखमी झाले. यापैकी तिघांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहर आणि परिसरात सकाळपासून वातावरण ढगाळ होते. दुपारी अनेक भागांत सोसाट्याचा वारा सुटला. वार्‍याने धुळीचे लोट हवेत उंच उडत होते. वारा आणि ढगाळ वातावरण यामुळे पाऊस होईल अशी शक्यता होती. मात्र, दुपारी अडीचच्या सुमारास पावसाचा हलकासा शिडकावा झाला. दुपारी चार वाजताही काही ठिकाणी तुरळक झालेला वगळता पावसाने हुलकावणी दिली. ढगाळ वातावरणाने हवेतील आर्द्रता वाढली होती. पारा मात्र 37 अंशांपेक्षाही खाली आला.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेचा कडकडाट, सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला. शहराच्या पूर्वेकडील भागात अनेक भागांना पावसाने झोडपले. टोप, संभापूर, कासारवाडी आदी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. जोरदार पावसाने महामार्गावरील वाहतूक संथ झाली. काही ठिकाणी पावसाने पाणी साचले.

चंदगड तालुक्याच्या पूर्व भागाला विजांच्या कडकडाटासह वळीवाने झोडपून काढले. वार्‍याने झाडे उन्मळून पडली, तर अनेकांच्या घरांवरील कौले, पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. बेळगाव – वेंगुर्ला राज्य मार्गावर झाडांच्या फांद्या कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. कोवाड परिसरात ठिकठिकाणी शुक्रवारी दुपारी वळीव पावसाने झोडपले. एक-दीड तास कोवाड, किणी, कागणी, निट्टूर, मलतवाडी, नागरदळे भागांत ठिकठिकाणी पाऊस झाला. या पावसाने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. आजर्‍यात झालेल्या पावसाने आठवडी बाजारात तारांबळ उडाली.

SCROLL FOR NEXT