कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : शिवसेना आणि सत्ताधारी आमने-सामने

अमृता चौगुले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) सत्ताधारी आघाडी आणि शिवसेना आमने-सामने आले आहेत. उर्वरित गटांतील नऊ जागांवर शेकाप आणि आरपीआयला सोबत घेऊन लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीने महिला, एनटी आणि प्रक्रिया गटातील राहिलेल्या तिन्ही जागांची घोषणा मंगळवारी केली.

उर्वरित गटांतील नऊपैकी तीन जागांची मागणी शिवसेनेने केली होती. मात्र, सत्ताधारी आघाडीने खा. संजय मंडलिक आणि माजी खा. निवेदिता माने यांच्यासह स्वीकृतची ऑफर दिली होती. शिवसेनेने स्वीकृतऐवजी तिसरी जागा मागितली होती. मान्य न झाल्यास नऊ जागांवर निवडणूक लढवण्याची ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) घोषणा सोमवारी रात्री केली होती. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीने ओबीसी, पतसंस्था, एससी आणि बँका, प्रक्रिया, महिला, दूध संस्था या सहा गटांतील उमेदवारांची घोषणा केली.

मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून शासकीय विश्रामगृह येथे नेत्यांच्या बैठका झाल्या. यातून मार्ग न निघाल्याने सत्ताधारी आघाडीने राहिलेल्या तीन जागांची घोषणा केली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. पी. एन. पाटील, आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे आदी उपस्थित होते.

नऊ उमेदवार… ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

इतर मागासवर्गीय गट विजयसिंह माने, बँक आणि पतसंस्था गट आ. प्रकाश आवाडे, अनुसूचित जाती-जमाती गट आ. राजू आवळे, महिला गटातून माजी खा. निवेदिता माने आणि श्रुतिका काटकर, इतर शेती, दूध संस्था गटातून भैया माने, प्रक्रिया संस्था गट प्रदीप पाटील-भुयेकर आणि मदन कारंडे, भटक्या आणि विभुक्त जाती स्मिता युवराज गवळी अशा नऊ जागांची घोषणा केली. शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी निवेदिता माने, प्रदीप पाटील आणि स्मिता गवळी या तीन नावांची घोषणा नेत्यांनी केली.

अखेरचा जय महाराष्ट्र! ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

पालकमंत्री सतेज पाटील हे साडेअकरा वाजता शासकीय विश्रामगृह येथे आले. यावेळी ना. सतेज पाटील आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी एकमेकाला नमस्कार केले. यानंतर पुन्हा सतेज पाटील यांनी मागे वळून संजय पवार यांना जय महाराष्ट्र, असे संबोधले. जिल्हा बँकेपुरता हा अखेरचा जय महाराष्ट्र नाही ना..! अशी चर्चा रंगली.

दिवसभर घालमेल ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असतानाच सत्ताधारी आघाडीचे तालुका संस्था गटातील निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात होते. नऊ जागांवर सक्षम उमेदवारांची चाचपणी शिवसेनेकडून सुरू होती. तर सत्ताधारी आघाडीकडून उर्वरित नऊ गटांत शिवसेनेला उमेदवार मिळू नयेत, यासाठी माघारीची धांदल वाढली होती. माघारीच्या निमित्ताने दिवसभर शासकीय विश्रामगृहावर घालमेल सुरू होती.

निवेदिता माने सत्ताधारी आघाडीसोबत

माजी खा. निवेदिता माने यांनी शिवसेना आघाडीसोबत राहावे, यासाठी खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आबिटकर, माजी आ. चंद्रदीप नरके आणि सत्यजित पाटील आदींसह पदाधिकार्‍यांनी विनंती केली. मात्र, माने यांनी सत्ताधारी आघाडीसोबतच राहणे पसंद केले.

शेवटपर्यंत तडजोडीचे प्रयत्न

शिवसेना हा महाविकास आघाडीचा कणा आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील राजकारणात शिवसेनेला सोबत घेऊनच वाटचाल केली. शिवसेना जिल्हा बँकेच्या राजकारणात सोबत असावी, यासाठी प्रयत्न केले. शेवटपर्यंत वाट पाहिली; परंतु यश आले नाही. म्हणूनच तीन जागांची घोषणा करून निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरवले असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

यड्रावकरांच्या घडामोडी 'मातोश्री'वर कळवणार

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सोमवारी (दि. 20) रात्री शासकीय विश्रामगृह येथे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषेदेला उपस्थित राहून शिवसेनेसोबत राहणार असल्याचे दर्शवले होते. मात्र, दुसर्‍या दिवशी ना. राजेंद्र पाटील हे सत्ताधारी आघाडीच्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यड्रावकरांच्या घडामोडी 'मातोश्री'वर कळवणार असल्याचे दुधवडकर यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT